आता नागरिकांना करता येणार ‘ई-तक्रार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:11 PM2017-11-09T13:11:47+5:302017-11-09T13:19:35+5:30

महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार असून त्या तक्रारीवर काय ‘अ‍ॅक्शन’ घेतली, समस्येचे निराकरण, उपाययोजना काय केल्या हेसुद्धा घरबसल्या कळणार आहे.

Now citizens can make e-complaint | आता नागरिकांना करता येणार ‘ई-तक्रार’

आता नागरिकांना करता येणार ‘ई-तक्रार’

Next
ठळक मुद्देजानेवारीपासून ‘अ‍ॅप’वर सुविधाशहराचे मानांकनही ठरणार, स्वच्छतेवर जनजागृती


गणेश खवसे ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नगर परिषद, महापालिकेचे कार्यालय गाठून तक्रार करा. त्याची पोचपावती घ्या. त्यानंतर संबंधित विभाग तुमच्या तक्रारीवर कार्यवाही करेल. मात्र त्या समस्येचे निराकरण झाले की नाही, कुठपर्यंत काम झाले याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नव्हती. परंतु आता नगर परिषद, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार असून त्या तक्रारीवर काय ‘अ‍ॅक्शन’ घेतली, समस्येचे निराकरण, उपाययोजना काय केल्या हेसुद्धा घरबसल्या कळणार आहे. विशेषत: स्वच्छतेविषयक तक्रारींचा निपटारा करण्यात येणार असून केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने ‘स्वच्छता’ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध केले आहे. याच अ‍ॅपद्वारे नागरिकांनी शहराला दिलेल्या प्रतिसादावरून शहराची ‘रँकिंग’ ठरणार आहे.
अशी करा स्वच्छतेविषयक ‘ई-तक्रार’
स्वच्छताविषयक तक्रार नोंदविण्यासाठी केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने ‘स्वच्छता अ‍ॅप’ विकसित केले आहे. कोणत्याही स्मार्टफोनवर ते डाऊनलोड करता येऊ शकते. हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी ‘प्ले स्टोअर’मध्ये इंग्रजीत ‘स्वच्छता - मोहुआ’ (स्वच्छता - मिनिस्ट्री आॅफ अर्बन डेव्हलपमेंट) टाकून डाऊनलोड करा. त्यानंतर पसंतीची भाषा निवडा, आपला मोबाईल क्रमांक योग्य जागी नमूद करा. तुम्हाला लगेच ओटीपी (वन टाईम पासवर्ड) मिळेल. त्यानंतर ‘पोस्ट युवर फर्स्ट कम्प्लेंट’ (पहिली तक्रार पोस्ट करा)वर क्लिक करा. आता अस्वच्छतेबाबत जी तक्रार नोंदवायची आहे त्या जागेचा फोटो काढा, ती योग्य विवरण (मृत प्राणी, कचऱ्याचा ढीग, कचरा गाडी आली नाही यापैकी कोणतीही)वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या परिसराचे लोकेशन व लॅन्डमार्क (स्थळ व लगतची ठळक खूण) टाईप करा हे झाल्यावर स्क्रीनवर खालीच ‘पोस्ट करा’ शब्द दिसतील त्यावर क्लिक करा. याप्रकारे तुम्ही ‘ई-तक्रार’ करू शकता. तक्रार नोंदविल्यानंतर ती तक्रार नगर परिषद मुख्यालयातील संबधित कार्यालयाकडे जाईल आणि तो संबधित क्षेत्राच्या जबाबदार कर्मचाºयाकडे तत्काळ पाठवेल. संबंधित कर्मचारी तक्रार निवारण करून त्या जागेचा तक्रार निवारणानंतरचा फोटो काढेल व पोस्ट करेल. तो संबधित नागरिकासही तत्काळ दिसणार आहे.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मशताब्दीनिमित्त २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याची शपथ घेण्यात आली. त्यादृष्टीने देशात ‘स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून २०१६ मध्ये ७४ तर २०१७ मध्ये ४३४ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. या दोन्ही मोहिमेच्या यशानंतर जानेवारी - फेब्रुवारी २०१८ मध्ये देशातील ४०४१ शहरामध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये विशेषत: नगर परिषदांचा समावेश आहे.
नागरिकांचा व्यापक स्वरूपात सहभाग वाढविण्यावर भर देणे, समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये जनजागृती करणे, शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविण्याच्यादृष्टीने निकोप स्पर्धेची प्रेरणा निर्माण व्हावी, हा या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू आहे.
सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग अत्यंत मोलाचा असल्याने सर्वेक्षणाचा उद्देश, कार्यपद्धती आणि त्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी पारंपरिक माध्यमांसोबतच सोशल मीडियाचा राष्ट्रीय, राज्य आणि शहर स्तरावर उपयोग केला जाणार आहे. शहरांचे ग्रेडिंग ठरविण्यासाठी तीन भागांमध्ये गुण दिले जाणार आहे. त्यातील तिसºया भागात नागरिकांचा प्रतिसाद अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यात प्रतिसादावर १००० गुण तर ‘स्वच्छता अ‍ॅप’च्या प्रतिसादावर ४०० असे एकूण १४०० गुण ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे जेवढा नागरिकांचा प्रतिसाद लाभेल, तेवढे शहरांचे गुणांकन वाढेल. सोबतच जेवढा नागरिकांचा या मोहिमेत सहभाग राहील, तेवढे शहर स्वच्छ - सुदंर तर राहीलच सोबतच शहराचे ‘मानांकन’ही वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांचा सहभाग, प्रतिसाद वाढविण्यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे.
रामटेकचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी या मोहिमेला ‘लोकचळवळ’ बनविले आहे. या अ‍ॅपवर जानेवारीपासून खºया अर्थाने काम करण्यात येणार असले तरी ते आतापासूनच उपलब्ध आहे. नागरिक आताही त्यावर तक्रारी करू शकतात. आतापर्यंत एक कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी ते अ‍ॅप डाऊनलोड केलेले आहे.
जनजागृतीवर अधिक भर
‘मोबाईल अ‍ॅप्स’च्या माध्यमातून नागरिकांना तक्रार करता येणे शक्य आहे. त्यामुळे शहरात कुठेही अस्वच्छता दिसणार नाही, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. स्वच्छता ही मुख्यत: नागरिकांच्या सहभागावर अवलंबून असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. शिक्षकांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. हॉटेल व्यावसायिकांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. स्वच्छता मोहिमेत अ‍ॅपचा जास्तीत जास्त वापर करणाºया शहरासाठी विशेष गुण राखून ठेवले आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी हे ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करून आपला सहभाग नोंदवावा आणि आपल्या शहराला अधिक गुण प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करावे.
- जुम्मा प्यारेवाले,
मुख्याधिकारी, नगर परिषद, रामटेक.

Web Title: Now citizens can make e-complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.