आता तरी शब्दांचे खेळ बंद करा
By admin | Published: July 12, 2017 02:58 AM2017-07-12T02:58:29+5:302017-07-12T02:58:29+5:30
अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेत केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले आहे.
विहिंपची केंद्रावर टीका : सरकारच्या अपयशी धोरणातूनच झाला अमरनाथ हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेत केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले आहे. केंद्राने आता तरी शब्दांचे खेळ बंद करावेत व जिहादी दहशतवाद्यांना संपविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, या शब्दांत केंद्राला धारेवर धरले आहे.
काश्मीरमध्ये केंद्राच्या अपयशी धोरणांमुळे जिहादी हल्ले वाढले असून, अमरनाथ हल्लादेखील त्यातूनच झाल्याचा आरोप विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला आहे.
या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विहिंपतर्फे पत्रक जारी करण्यात आले. देशात सातत्याने दहशतवादी कारवाया वाढत आहेत. त्यामुळे अशा तत्त्वांशी किंवा त्यांना समर्थन करणाऱ्यांशी चर्चा करणे बंद केले पाहिजे. जर शासनाने आताच पावले उचलली नाही तर संपूर्ण भारतात अशाप्रकारे जिहादी कारवाया वाढतील, असे डॉ. तोगडिया यांनी या पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे. जिहादी दहशतवाद्यांना आश्रय देणारे स्थानिक लोक, संस्था यांच्यावर कारवाई व्हावी तसेच त्यांचे आर्थिक स्रोत नष्ट करण्याबाबत केंद्राने ठोस धोरण तयार केले पाहिजे. संपूर्ण काश्मीर हा भारताचाच आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात यावे तसेच पाकिस्तान व चीनशी चर्चा बंद केली पाहिजे, अशी मागणी डॉ. तोगडिया यांनी केली आहे.
...तर निवडणुकांत भोगावे लागेल
अमरनाथ यात्रा नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. यात्रेकरूंना सुरक्षा प्रदान करणे ही केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी आहे. सुरक्षा दिली नाही तर लोकशाही पद्धतीत निवडणुकांमध्ये याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा डॉ. तोगडिया यांनी दिला. सरकारने काश्मीरमध्ये सैन्याला सर्वाधिकार दिले पाहिजेत तसेच पूर्णकालीन संरक्षणमंत्री नेमण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीदेखील केली.
मोदींवरदेखील टीका
जगातील सर्वच देशांना जिहादी दहशतवादाचे चटके जाणवत आहेत व ते याबाबतीत गंभीर आहे. विदेशांमध्ये दहशतवादावर बोलायचे आणि देशात मात्र कृती करायची नाही, हे अयोग्य आहे, या शब्दांत डॉ. तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता टीका केली आहे.