आता नागपुरात ‘कोल्ड फॉगिंग’ने डासांशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 07:50 PM2018-07-27T19:50:51+5:302018-07-27T20:07:04+5:30
डासांशी लढा देण्यासाठी महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने पाच ‘कोल्ड फॉगिंग’ मशीन विकत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, ही डिझेल वापरून धूर सोडणारी मशीन नाही, पाण्यात औषधी टाकून फवारणी करणारी मशीन आहे. या मशीनचा वापर घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी करता येतो. सध्या ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत त्या भागांतील घरांमध्ये या मशीनद्वारे फवारणी केली जात आहे. या फवारणीमुळे पूर्ण वाढ झालेल्या डासांचा नायनाट होत असल्याने चांगला प्रभाव दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डासांशी लढा देण्यासाठी महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने पाच ‘कोल्ड फॉगिंग’ मशीन विकत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, ही डिझेल वापरून धूर सोडणारी मशीन नाही, पाण्यात औषधी टाकून फवारणी करणारी मशीन आहे. या मशीनचा वापर घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी करता येतो. सध्या ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत त्या भागांतील घरांमध्ये या मशीनद्वारे फवारणी केली जात आहे. या फवारणीमुळे पूर्ण वाढ झालेल्या डासांचा नायनाट होत असल्याने चांगला प्रभाव दिसून येत आहे.
उपराजधानीत पावसाचा जोर कमी होऊ लागल्याने डासांचा प्रादूर्भाव दिसून येऊ लागला आहे. जानेवारी ते आतापर्यंत डेंग्यूच्या १८ रुग्णांची नोंद झाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने डासांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी उन्हाळ्यापासूनच घराघरांची झाडाझडती घेणे सुरू केले आहे. विभागाच्या चमूने जून महिन्यात २७ हजार २८८ घरांची तपासणी केली असून यात ४९५ घरांत डेंग्यूचे डास व अळ्या आढळून आल्या आहेत. या दूषित घर व परिसरांमध्ये कीटकनाशक फवारणी करण्याची मोहीमही हाती घेतली आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडे डासांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी डिझेलचा वापर करून धूर सोडणाऱ्या पाच मोठ्या तर हाताने वापरणाºया दहा ‘थर्मल फॉगिंग’ मशीन आहेत. आता यात पाच ‘कोल्ड फॉगिंग’ मशीनची भर पडली आहे. प्रायोगिक स्तरावर या मशीनचा वापर होत असलातरी गेल्या चार महिन्यात याचा चांगला प्रभाव दिसून येत असल्याचे व राज्यात हा पहिलाच प्रयोग असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
असा होतो वापर
थर्मल फॉगिंग मशीनच्या औषधाच्या टाकीची क्षमता १० लिटर आहे. हाताने वापरणारी ही मशीन पेट्रोलनी चालते. प्रति लिटर पाण्यात १२ ग्रॅम ‘सॉलफॅक्ट’ औषध टाकून फवारणी केली जाते. घरात व बाहेरही याची फवारणी करता येते. फवारणीचा ‘फोर्स’ खूप जास्त असल्याने उंच झाडांपर्यंत फवारणी करणेही सोपे होते. विशेष म्हणजे, फवारणीच्या काही मिनिटांमध्येच डासांसोबतच इतर कीटकांचा सडा पडलेला दिसून येतो.
‘थर्मल फॉगिंग’मध्ये डिझेलमध्ये औषध टाकून त्याचा धूर परिसरात सोडला जातो. यामुळे प्रदूषणात तर वाढ होतेच शिवाय डिझेल असल्याने खर्च चार पटीने वाढतो. त्या तुलनेत ‘कोल्ड फॉगिंग’ मशीनमध्ये डिझेलच्या ऐवजी पाण्याचा वापर होतो. यामुळे खर्च कमी होतो. शिवाय धूर न सोडता औषधाची फवारणी होत असल्याने प्रदूषणही कमी होते. शिवाय, डबक्यात किंवा ड्रम, टाकीमधील पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्या तर औषध बदलवून तिथेही फवारणी करता येते.
‘कोल्ड फॉगिंग’ला ‘डब्ल्यूएचओ’ची मान्यता
प्रायोगिक स्तरावर नागपुरात ‘कोल्ड फॉगिंग’ला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा. याचा चांगला प्रभाव दिसून येत आहे. ‘कोल्ड फॉगिंग’ला जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मान्यता प्राप्त आहे. तूर्तास पाच मशीन विकत घेण्यात आल्या असून याचा प्रयोग ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे त्या भागात केला जात आहे.
डॉ. जयश्री थोटे
मुख्य अधिकारी, हिवताप व हत्तीपाय रोग विभाग