आता रंग, गंध-सुवास, आवाजाचीही बाैद्धिक संपदा!; भारताला अमर्याद संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 02:18 AM2020-12-01T02:18:24+5:302020-12-01T02:18:33+5:30
पुनिता जैन : साधारणपणे आयपी म्हणजे पेटन्ट एवढेच शिकल्यासवरल्या लोकांनाही वाटते. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध बाैद्धिक संपदेशी आहे
नागपूर : चित्रपट, पुस्तकांचे काॅपीराईट किंवा वैज्ञानिक शोध, उपकरणांच्या पेटन्टपुरते मर्यादित असलेले बाैद्धिक संपदेचे जग आता इतके विस्तारले आहे, की पुढच्या काळात एखादा रंग, गंध, सुवास आणि विशिष्ट आवाजाचीही नोंद इंटेलेक्चुअल प्राॅपर्टी म्हणजे ‘आयपी’अंतर्गत होईल. पाश्चात्य जग याबाबत खूप पुढे असून, खानपान, वेशभूषा आदींबाबत प्रचंड विविधता असलेल्या भारताला सजग राहावे लागेल. या क्षेत्रात अमर्याद संधी असतील, असे या विषयाच्या तरुण अभ्यासक, रायपूरच्या पुनिता जैन यांचे म्हणणे आहे.
मुंबईच्या किरीट मेहता विधी महाविद्यालयातून फॅशन लाॅमध्ये कायद्याची पदवी घेतलेल्या पुनिता जैन यांनी नुकतीच अमेरिकेतील येशिवा विद्यापीठाच्या बेंजामिन कार्डोझो स्कूल ऑफ लाॅमधून एलएलएम पदवी प्राप्त केली असून, युवा पिढीच्या दृष्टीने या अगदीच नव्या विषयाच्या संधीची क्षितिजे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना उलगडून सांगितली. यवतमाळ येथील ॲड. अमरचंद दर्डा यांची पुनिता ही नात आहे.
त्या म्हणाल्या, की साधारणपणे आयपी म्हणजे पेटन्ट एवढेच शिकल्यासवरल्या लोकांनाही वाटते. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध बाैद्धिक संपदेशी आहे. खाण्यापिण्याच्या चिजा, वस्त्रप्रावरणे, फॅशनमधील प्रत्येक वस्तूंचा यात समावेश होतो. आता तर रंग, गंध, आवाज अशा कल्पनेपलीकडील बाबींची आयपी म्हणून नोंद होते. उदा. डेअरी मिल्कच्या उत्पादनांचा खास जांभळा रंग ही त्या कंपनीची बाैद्धिक संपदा आहे. टिफनीचा परफ्यूम उत्पादनांचा निळा रंग ही त्यांचीच खासियत आहे. ख्रिश्चन लोब्युटिन पादत्राणांच्या तळव्याचा रंग हा त्यांचा आयपी आहे. युरोप, अमेरिका याबाबत अधिक जागरूक आहेत. भारतात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे कायदे असले तरी या विषयाची सखोल माहिती व्यावसायिक व तज्ज्ञांना नाही. दहा-बारा वर्षांपूर्वी ट्रेडमार्कबाबत सिंगापूर करार झाला. परंतु, भारताने तो अद्याप मान्य केलेला नाही.
युवा पिढीपुढे कर्तबगारीचे नवे अवकाश
नानाविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ, विविधरंगी वेशभूषा, लोकसंस्कृतीची अनेक वैशिष्ट्ये अशा विविधतेने नटलेल्या भारतात या बाैद्धिक संपदेच्या नव्या जागतिक प्रवाहामुळे अमर्याद संधी आहेत. प्रत्येक प्रदेशाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. अगदी गंगाजलालादेखील जीआय मानांकन मिळू शकते. तेव्हा या सगळ्यांची योग्य नोंदणी व रक्षणाच्या निमित्ताने युवा पिढीसमाेर कर्तबगारीचे नवे अवकाशही खुले होणार आहे, असे पुनिता जैन म्हणाल्या.
असे आहेत प्रकार
पेटन्ट, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट, इंडस्ट्रिअल डिझाईन, काॅपीराईट किंवा जिओग्राफिकल इंडिकेटर्स (जीआय) आदी बाौद्धिक संपदेचे प्रकार आहेत. प्राचीन ग्रंथसंपदेच्या मदतीने अमेरिकेसोबत हळदीच्या पेटन्टची लढाई आपण जिंकली. बासमती तांदळाचेही असेच झाले. कोल्हापुरी चप्पल, दार्जिलिंग चहा वा नागपुरी संत्रा ही ‘जीआय’ म्हणजे भाैगोलिक मानांकनाची उदाहरणे आहेत. पॅरिसचा आयफेल टाॅवर किंवा सिडनीचे ऑपेरा हाऊस ही वारसास्थळे संपदा म्हणून नोंद आहेत. मॅकडोनाल्ड, कोकाकोला, पेप्सीच्या उत्पादनांची विशिष्ट चव हे त्यांचे ट्रेड सिक्रेट आहे, असे पुनिता जैन यांनी सांगितले.