आता नागपुरातील शाळा-महाविद्यालयांत ‘सायबर क्लब’, अर्ध्या तासात होणार ऑनलाईन तक्रार
By योगेश पांडे | Published: August 8, 2024 08:59 PM2024-08-08T20:59:52+5:302024-08-08T21:00:01+5:30
नागपूर पोलिसांचा पुढाकार : पोलीस-विद्यार्थ्यांमधील दुवा बनणार ‘क्लब’चे सदस्य.
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सबकुछ ऑनलाईनच्या युगात सायबर फसवणूक व इतर गुन्हयांचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेषत: महाविद्यालयांती विद्यार्थी-विद्यार्थिनी लवकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहे. हीच बाब लक्षात घेऊन टीनएजर्स व तरुणाईत सायबर जागृती निर्माण व्हावी तसेच गुन्हा झाल्यास त्यांना लगेच मदत मिळावी यासाठी शाळा-महाविद्यालयांत ‘सायबर क्लब’ची स्थापना करण्यात येणार आहे. नागपूर पोलिसांकडून हा पुढाकार घेण्यात आला असून रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातून याच गुरुवारी सुरुवात झाली.
पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून या ‘सायबर क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे.
प्रत्येक शाळा - महाविद्यालयात असा क्लब स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. या क्लबमध्ये शिक्षक व विद्यार्थी सदस्य असतील. त्यात विद्यार्थिनींचादेखील समावेश असेल. त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येईल. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर अलर्टनेस निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. तसेच कुणासोबत सायबर फ्रॉड झाला तर पोलिसांशी संपर्क करून अर्ध्या तासात ऑनलाईन तक्रार दाखल होण्याबाबत पावले उचलण्यात येतील. गुरुवारच्या कार्यक्रमात पोलीस आयुक्तांन याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सायबर क्लबच्या सदस्य डॉ.रश्मी वेलेकर यांनी प्रास्ताविक केले. पोलीस उपायुक्त निमीत गोयल यांनी सायबर गुन्हेगार कसे जाळयात ओढतात व गुन्हे करण्याची पध्दती तसेच गुन्हे कसे होतात, यावर प्रकाश टाकला. प्रा.राकेश कडून यांनी आभार मानले. वेदांत नायडू व वराध्या कुळकर्णी यांनी संचालन केले.
असा असेल शाळा-महाविद्यालयांतील सायबर क्लब
- क्लबमध्ये मुलींचा समावेष अनिवार्य असेल.
- क्लबच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सायबर जागृतीवर भर.
- महाविदयालयात कोणत्याही विदयार्थ्यासोबत सायबर गुन्हा घडल्यास विदयार्थी क्लब सदस्याशी संपर्क करतील.
- क्लबचे सदस्य पिडीताचा पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करवून देतील.
- प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील सायबर अधिकारी या सायबर क्लब्सचे देखरेख अधिकारी असतील.
- पिडीत विदयार्थ्याची तक्रार प्राप्त झाल्यावर ती तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर दाखल करून संबंधिताला ऑनलाईन प्रत देण्यात येईल.
- सायबर तक्रारीचे स्वरूप पाहुन नमुद तक्रार सायबर पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात येईल