आता मृत्यूच मला नाटकापासून वेगळं करेल
By admin | Published: July 17, 2017 02:51 AM2017-07-17T02:51:59+5:302017-07-17T02:51:59+5:30
आकाशात उडून मी केवळ माझे समाधान करू शकलो असतो. परंतु नाट्यक्षेत्रात उतरून मी अनेक नाट्य रसिकांचे समाधान करू शकलो.
रमेश अंभईकर : अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात व्यक्त केली कृतज्ञता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आकाशात उडून मी केवळ माझे समाधान करू शकलो असतो. परंतु नाट्यक्षेत्रात उतरून मी अनेक नाट्य रसिकांचे समाधान करू शकलो. या रंगभूमीने मला जगण्याचे प्रयोजन दिले. आता या प्राणप्रिय नाटकापासून केवळ माझा मृत्यूच मला वेगळे करू शकतो, अशा हळव्या शब्दात ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य दिग्दर्शक रमेश अंभईकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यशवतंराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठान आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी श्री साई सभागृहात रमेश अंभईकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार पार पडला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी तर प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर,ज्येष्ठ लेखिका आशा बगे, महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे, चित्रा अंभईकर आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते अंभईकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विकास सिरपूरकर म्हणाले, विष्णूदास भावेंपासून सुरू झालेल्या नाट्यपरंपरेने कला क्षेत्राला दिवसागणिक समृद्ध केले. नाट्य इतिहासात मानाचे पान ठरलेले पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर यांच्यानंतर स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे रमेश अंभईकर आहेत. नाट्य संहिता ही त्रिवेणी संगम असते. त्याच संहितेला धरुन अंभईकरांनी दिग्दर्शनातून प्रयोग केले आणि नाटकाला वैभव मिळवून दिले.
आशा बगे म्हणाल्या, दारव्हेकर मास्तरांमुळे नाट्यक्षेत्राला लाभलेल्या सुवर्णकाळाची अनुभूती अंभईकरांनी रसिकांना करवून दिली. डॉ. गिरीश गांधी म्हणाले, सध्या मराठी रंगभूमीचे दिवस लयाला जात आहेत. दारव्हेकर, अंभईकर यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकर्मीपासून नवीन रंगकर्मींनी बोध घेतला पाहिजे. मुंबई, पुण्यात नाट्य क्षेत्रात नवनवीन संहिता निर्माण होतात. नवे प्रयोग होतात. त्या तूलनेत विदर्भ मागे आहे. जा रंगकर्मींनी नाट्यचळवळ निर्माण केली. ती चळवळ नव्या रंगकर्मींनी जोपासली पाहिजे. या कार्यक्रमाचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.