आता होणार खासगीकरणातून नागपूर विमानतळाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:04 PM2018-01-17T23:04:36+5:302018-01-17T23:07:28+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आणि संकल्पना, बांधणी, वित्तसाहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे (डीबीएफओटी) या तत्त्वावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे खासगीकरणातून विमानतळाचा विकास आता खरोखरच होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आणि संकल्पना, बांधणी, वित्तसाहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे (डीबीएफओटी) या तत्त्वावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे खासगीकरणातून विमानतळाचा विकास आता खरोखरच होणार आहे.
नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक विमानतळ (मल्टी-मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अॅण्ड एअरपोर्ट अॅट नागपूर) विकसित होत आहे. या प्रकल्पात नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विशेष आर्थिक क्षेत्र व संलग्न सेवा-व्यवसाय असे दोन उपप्रकल्प समाविष्ट आहेत.
नागपूर विमानतळ हे भारताच्या केंद्रस्थानी असणारे महत्त्वाचे विमानतळ आहे. सध्या मिहान इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत विमानतळाचे संचालन करण्यात येते. मिहान इंडिया या संयुक्त कंपनीमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (एएआय) यांचा अनुक्रमे ५१ आणि ४९ टक्के टक्के वाटा आहे. या दोन घटकांनी केलेल्या करारनाम्यानुसार या विमानतळाचा विकास खासगी विकासकाकडून करण्यात येणार आहे.
नागपूर विमानतळाचा विकास सार्वजनिक-खासगी भागीदारीतून करण्याचा निर्णय २३ जुलै २०१७ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विनंती (आरएफक्यू-रिक्वेस्ट फॉर कोटेशन) प्रक्रियेद्वारे पाच कंपन्यांची निवड करण्यात आली. या पाच कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी, प्रस्तावाकरिता विनंती (आरएफपी-रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) आणि सवलत करारनामा (कन्सेशन अॅग्रीमेंट) या दस्तऐवजांना मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली आहे.