वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आता हिंगणघाटमधूनही थेट रेल्वेची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 09:13 PM2023-05-27T21:13:44+5:302023-05-27T21:14:31+5:30
Nagpur News माता वैष्णोदेवीच्या भक्तांना आता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या रेल्वेस्थानकावरूनही रेल्वेगाडीत बसता येईल. चेन्नई आणि जयपूर येथेही थेट जाण्यासाठी या स्थानकावर रेल्वेगाडी थांबणार आहे.
नागपूर : माता वैष्णोदेवीच्या भक्तांना आता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या रेल्वेस्थानकावरूनही रेल्वेगाडीत बसता येईल. चेन्नई आणि जयपूर येथेही थेट जाण्यासाठी या स्थानकावर रेल्वेगाडी थांबणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे बोर्डाने हिंगणघाटला सहा रेल्वेगाड्यांचा थांबा देण्याचे जाहीर केले असून, रविवार २८ मे पासून त्याची सुरुवात होत आहे.
रेल्वे गाडी क्रमांक १६०३२ श्री माता वैष्णोदेवी कटरा चेन्नई एक्स्प्रेस २८मे रोजी सकाळी १० वाजून २८ मिनिटांनी येईल. येथे प्रवाशांची चढ-उतार झाल्यानंतर दोन मिनिटांनी चेन्नईच्या दिशेने प्रस्थान करील.
त्याचप्रमाणे चेन्नईहून श्री माता वैष्णोदेवी कटराकडे निघालेली रेल्वे गाडी क्रमांक १६०३१ हिंगणघाट रेल्वेस्थानकावर २९ मे रोजी रात्री ११:४२ वाजता येईल. येथे दोन मिनिटांच्या थांब्यात प्रवाशांना उतरवून नवीन प्रवासी घेतल्यानंतर ती कटराकडे निघेल.
अशाच प्रकारे १२९६८ जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस २९ मे रोजी दुपारी ३:३८ वाजता येईल आणि ३ वाजून ४० मिनिटांनी हिंगणघाट स्थानकातून पुढच्या प्रवासाला प्रस्थान करील. १२९६७ चेन्नई-जयपूर एक्स्प्रेस २९ मे रोजी सकाळी ९:०३ वाजता हिंगणघाट येथे येईल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर पुढच्या प्रवासाला निघेल.
रेल्वे गाडी क्रमांक १२५११ गोरखपूर कोचुवेली एक्स्प्रेस २९ मे रोजीच्या सकाळी ५:२८ वाजता हिंगणघाट स्थानकावर येईल आणि ५:३० वाजता पुढच्या प्रवासाला निघेल. त्याचप्रमाणे १२५१२ कोचुवेली गोरखपूर एक्स्प्रेसचे हिंगणघाटच्या रेल्वेस्थानकावर २९ मे रोजी दुपारी २:१३ वाजता आगमन होईल आणि २:१५ वाजता ती येथून प्रस्थान करील.
पुढच्या सहा महिन्यांपर्यंत रेल्वेने हा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.
प्रवाशांना आवाहन
उन्हाळ्यात रेल्वेगाड्यांमध्ये ठिकठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही सोय केली आहे. रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.