आता साध्यासोप्या पद्धतीने करा पेरणी; सीड ड्रमचा वापर ठरतोय उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 10:59 AM2021-07-07T10:59:32+5:302021-07-07T11:01:01+5:30

Nagpur News पऱ्हे टाकण्यापासून तर रोवणीपर्यंत धानाच्या लागवडीसाठी येणाऱ्या हजारो रुपयांच्या खर्चावर आता ‘सीड ड्रम’ या साध्या-सोप्या यंत्राने पर्याय दिला आहे.

Now do the sowing in a simple way; Use of seed drum is useful | आता साध्यासोप्या पद्धतीने करा पेरणी; सीड ड्रमचा वापर ठरतोय उपयुक्त

आता साध्यासोप्या पद्धतीने करा पेरणी; सीड ड्रमचा वापर ठरतोय उपयुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यात पहिला प्रयोग तीन वर्षांपासून धूळखात पडले होते यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पऱ्हे टाकण्यापासून तर रोवणीपर्यंत धानाच्या लागवडीसाठी येणाऱ्या हजारो रुपयांच्या खर्चावर आता ‘सीड ड्रम’ या साध्या-सोप्या यंत्राने पर्याय दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील कवडसी या गावातील शेतशिवारात मंगळवारी याचा पहिला प्रयोग झाला. रोवणीसाठी एकरी पाच हजार रुपयांचा येणारा खर्च अवघ्या ६०० रुपयांवर आल्याचे बघून शेतकरीही आनंदले.

ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर यांच्या प्रयत्नातून कवडसी येथील शेतकरी प्रेमदास वनवे यांच्या शेतीत हे प्रात्यक्षिक करण्यात आले. बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाबूलाल जाटमाटे, गुरुदेव बाभरे व सुमेध रोडगे यांनी शेतात सीड ड्रमद्वारे लागवड केली. जिल्हा कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, पंकज इंगोले यांच्यासह परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच तसेच अनेक शेतकरी व युवक उपस्थित होते. यापूर्वी हा प्रयोग सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रात झाला आहे. अद्याप शेतकऱ्यांनी या तंत्राचा वापर केला नसल्याने ही पहिलीच वेळ ठरली आहे.

कृषी विज्ञान केंद्राची उदासीनता

कृषी विज्ञान केंद्राच्या साकोली येथील कार्यालयात मागील तीन वर्षांपासून हे यंत्र येऊन पडले होते. या यंत्राचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवावे, त्यांना कमी खर्चात धान शेती करण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा यामागील हेतू होता. मात्र, शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याची सबब पुढे करीत तब्बल तीन वर्षांपासून हे यंत्र धूळखात पडलेले होते. अखेर अविल बोरकर यांनी पुढाकार घेऊन ते आणले आणि यशस्वी प्रात्यक्षिकही केले.

असा करावा वापर

या यंत्राचा वापर करण्यापूर्वी मे महिन्यात शेतात रोटा कल्टिव्हेटर करून घ्यावे. पहिला पाऊस येताच चिखलणी करून घ्यावी. सीड ड्रमचा वापर करण्यापूर्वी धान बिजाई १८ तास पाण्यात भिजवून ठेवावी. या काळात कोंब येतात, त्यामुळे पक्षी खात नाही, वाहूनही जात नाही. १० बाय १० इंच अंतरावर बीज पडते. धान रोवणीसाठी एकरी ५ हजार रुपयांचा खर्च येतो. यात फक्त एक ते दोन जणांच्या मजुरीचा तेवढा खर्च येतो.

यामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे. गाव पातळीवर ‘टूल बँक’ उघडल्यास शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चात ही उपकरणे मिळू शकतात. ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ यासाठी प्रयत्न करणार आहे.

- अविल बोरकर, सचिव, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ

...

Web Title: Now do the sowing in a simple way; Use of seed drum is useful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती