आता औषधी केवळ आयसीयू, शस्त्रक्रियामधील रुग्णांसाठीच; 'मेयो'तील धक्कादायक स्थिती
By सुमेध वाघमार | Published: October 4, 2023 11:02 AM2023-10-04T11:02:40+5:302023-10-04T11:03:54+5:30
दोन वर्षांपासून हाफकिनकडून औषधीच नाहीत
सुमेध वाघमारे
नागपूर : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा झालेल्या मृत्यूने पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयांतील आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा चव्हाट्यावर आला आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेयो) औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णसेवा अडचणीत आली आहे. दोन वर्षांपासून हाफकिनकडून औषधी मिळाल्या नाहीत. स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करण्याची मर्यादाही संपली आहे. यामुळे आता केवळ आयसीयू, शस्त्रक्रियामधील रुग्णांसाठीच असल्याचे रुग्णालयातील धक्कादायक चित्र आहे.
शासकीय रुग्णालयांना लागणारी यंत्रसामग्री व औषधी खरेदीचे अधिकार २०१७ मध्ये हाफकिन महामंडळाला देण्यात आले. परंतु सहा वर्षांचा कालावधी होऊनही हाफकिनकडून औषधांसह, यंत्रसामग्रीचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. मेयोमध्ये २०२१ पासून औषधांचा पुरवठा नाही. यामुळे स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करण्यात आली. परंतु याची मर्यादा ३० टक्केच असून त्याचीही मर्यादा संपली आहे. औषधांचा तुटवड्यामुळे आकस्मिक विभाग, अतिदक्षता विभाग (आयसीयू) व शस्त्रक्रिया गृहातील रुग्णांना औषधी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात आहे.
नागपुरातील मेयो-मेडिकल रुग्णालयात २४ तासांत २५ मृत्यू; राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
- ३३ वर्षांपासून औषधांच्या अनुदानात वाढच नाही
मेयोमधील ५९४ रुग्ण खाटांना मंजुरी प्राप्त आहे. मात्र रुग्णांची वाढती संख्या पाहता ८५० खाटांवर रुग्णसेवा दिली जाते. त्या तुलनेत औषधी, सर्जिकल साहित्य, उपकरणे व इतरही साहित्यांच्या खरेदीसाठी सरकार वर्षाला ६ कोटी रुपयांचे अनुदान देते. मागील जवळपास ३३ वर्षांपासून या अनुदानात वाढ नाही. एकीकडे औषधांच्या किमती वाढल्या असतानाही दुसरीकडे वाढीव अनुदान नसल्याने आवश्यक औषधींचा प्रस्ताव तयार करण्यास रुग्णालय प्रशासनाला कसरत करावी लागते.
- साधे ‘टीटी’चे इंजेक्शन, ‘स्पीरीट’चाही तुटवडा
धनुर्वात प्रतिबंधासाठी दिले जाणारे ‘टिटॅनस टॉक्साइड’ (टीटी) हे १० ते १४ रुपयांना मिळणारे इंजेक्शनचा तुटवडा आहे. धक्कादायक म्हणजे, इंजेक्शन देण्यापूर्वी त्वचेच्या पृष्ठभागावर क्लिंजिंग एजंट म्हणून वापरले जाणारे ‘स्पीरीट’ही मोजक्याच प्रमाणात आहे. याशिवाय, जीवनरक्षक असलेले इंजेक्शन ‘वेकुरोनियम’, इंजेक्शन ‘अट्राकुरेनियम’, इंजेक्शन ‘अमोक्सक्लाव्ह’, रेबीज व्हॅक्सीन, रेबीज अँटीसेरम, ‘टॅब डिफेरोसिरॉक्स’, ‘इंजेक्शन ट्रामाडोल’, ‘इंजेक्शन डायक्लोफेनाक सोडियम’, किटाणुनाशक द्रव्यही जेमतेम असल्याची माहिती आहे.
- भरती रुग्णाला औषधी देण्याचा प्रयत्न
मेयोमध्ये काही औषधांचा तुटवडा आहे. स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करण्याची मर्यादा संपली आहे. त्यामुळे आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून व ‘पर्सनल लेझर अकाऊंट’मधून (पीएलए) औषधी खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. आवश्यक औषधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. भरती असलेल्या प्रत्येक रुग्णाला औषधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- डॉ. राधा मुंजे, प्रभारी अधिष्ठाता मेयो