आता रेशनच्या मोफत धान्यासाठी करावे लागणार ‘ई-केवायसी’; ३० जूनपर्यंत मुदत

By मोरेश्वर मानापुरे | Published: June 19, 2024 08:32 PM2024-06-19T20:32:28+5:302024-06-19T20:32:40+5:30

न करणाऱ्यांना धान्याला मुकावे लागणार

Now 'e-KYC' will have to be done for free ration food; Deadline till 30 June | आता रेशनच्या मोफत धान्यासाठी करावे लागणार ‘ई-केवायसी’; ३० जूनपर्यंत मुदत

आता रेशनच्या मोफत धान्यासाठी करावे लागणार ‘ई-केवायसी’; ३० जूनपर्यंत मुदत

नागपूर : सरकारच्या नवीन नियमांतर्गत रेशन कार्डाद्वारे मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना ३० जूनपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. या तारखेपर्यंत केवायसी न केल्यास रेशन कार्डधारकांना धान्य मिळणार नाही.

मोफत धान्य वितरण संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न पुरवठा विभाग अलर्ट मोडवर आला आहे. सरकारची खाद्य सुरक्षा योजना पारदर्शकरित्या राबविण्यासाठी कार्डधारकांना जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांमध्ये जाऊन केवायसी करायची आहे. केवायसी न करणाऱ्यांचे नाव खाद्य सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे. केवायसीकरिता कार्डावर नमूद ग्राहकांना कागदपत्रे देण्याची गरज नाही. मात्र, या सर्वांना रेशन दुकानातील बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून केवायसी करायचे आहे. याद्वारे कार्डावरील संबंधित व्यक्तीचा मॅसेज शिधावाटप निरीक्षकाच्या लॉगइनवर येईल आणि तो त्यांच्यातर्फे अप्रूव्हल केला जाईल. अशा सोप्या पद्धतीने ग्राहकांना केवायसी करायचे आहे. काही कारणास्तव कार्डावरील एखादा ग्राहक जिल्हा वा राज्याबाहेर असल्यास त्याचे केवायसी कसे होणार, याबाबत स्पष्टता नाही.

आधार केंद्रात अपडेट करावे बायोमेट्रिक
कार्डावर नमूद ग्राहकाचे केवायसी अनेक प्रयत्नानंतरही अपडेट होत नसेल तर त्याला आधार केंद्रात जाऊन बायोमेट्रिक अपडेट करता येईल. अपडेट झाल्यानंतरच त्याचे केवायसी होईल. सध्या प्रत्येक रेशन दुकानात ग्राहकाच्या केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, रेशन दुकानात मोफत धान्य घेणाऱ्यांची गर्दी पाहता दुकानदाराने कार्डधारकांना २० जूननंतर केवायसी करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकदा वयस्क आणि लहानांचे अंगठ्याचे ठसे जुळत नसल्यामुळे त्यांच्या केवायसी प्रक्रियेत समस्या उद्भवत आहे.

न्य वाटपातील घोटाळा बंद होणार, खऱ्यां लाभार्थींना मिळणार फायदा
गहू आणि अन्य धान्य वितरणात होणाऱ्या घोटाळ्याच्या तक्रारीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याच्या अन्न पुरवठा विभागाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाचे ई-केवायसी होईल आणि मोफत धान्यासाठी किती लोक पात्र आहेत, याची खरी आकडेवारी पुढे येईल. अपात्र लोकांचे नाव कार्डावरून काढून टाकण्यात येईल. याद्वारे मोफत धान्य घोटाळ्यावर नक्कीच नियंत्रण येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेशनकार्डवरून मृतकांची नावे वगळण्यात येणार !
जिल्ह्यात अनेकांच्या रेशनकार्डावर मृतकांच्या नावाची नोंद आहे. किंवा मुलींची लग्ने झावली आहेत. मात्र नाव रेशनकार्डवर आहे. त्यामुळेच त्यांची खाद्यान्न सुरक्षा यादीत अजूनही नोंद आहे. कुटुंबीयही त्यांच्या नावावर मोफत धान्य उचलत आहेत. मात्र आता ई-केवायसी प्रक्रियेमुळे अशांची नावे खाद्यान्न सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे.
 

Web Title: Now 'e-KYC' will have to be done for free ration food; Deadline till 30 June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.