आता शेतकऱ्यांचीदेखील वीज कापणार; सप्टेंबर २०२० अगोदरच्या थकबाकीदारांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 11:50 AM2021-02-17T11:50:40+5:302021-02-17T11:50:58+5:30
Nagpur News जर वीज देयक थकीत असेल तर घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांसोबतच आता कृषी जोडण्यादेखील कापण्यात येणार आहेत. यासंदर्भात महावितरणने निर्देश जारी केले असून चालू वीज देयक न भरणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास सांगितले आहे.
कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जर वीज देयक थकीत असेल तर घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांसोबतच आता कृषी जोडण्यादेखील कापण्यात येणार आहेत. यासंदर्भात महावितरणने निर्देश जारी केले असून चालू वीज देयक न भरणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास सांगितले आहे. नोटिशीची मुदत संपल्यानंतर जर शेतकऱ्यांनी देयक भरले नाही तर वीज कापण्यात येणार आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२० पर्यंतच्या थकबाकीदारांना दिलासा देण्यात आला असून त्यांच्या जोडण्या कापण्यात येणार नाहीत.
वीज जोडणी कापण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. दररोज आंदोलने होत आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी वीज जोडण्यांना यातून दूर ठेवण्यात आले होते. त्यांच्यासाठी कृषी पंप वीज जोडणी धोरणाची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत सप्टेंबर २०२० पर्यंतच्या थकीत देयकावर जोडणी न कापण्याची घोषणा झाली होती. शिवाय थकीत रक्कम बिनव्याजी व विलंब शुल्काविना तीन वर्षांत भरण्याची सुविधा देण्यात आली. परंतु सोमवारी महावितरणने परिपत्रक जारी करून सप्टेंबर व डिसेंबरमध्ये जारी करण्यात आलेले देयक न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. नोटीस जारी करून जोडणी कापण्यात येईल.
४४,७६७ कोटींची थकबाकी
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर महावितरणची एकूण थकीत रक्कम ७१,५०६ कोटींवर पोहोचली आहे. यातील ४४,७६७ कोटींची थकीत रक्कम ही कृषी जोडण्यांची आहे. महावितरणाच्या अहवालानुसार या श्रेणीत राज्यातील ४२ लाख ५० हजार ८१३ ग्राहक आहेत. या जोडण्यांचा उपयोग कृषीपंपांसाठी झाला आहे.