आता बनावट पॅनकार्डही
By admin | Published: August 19, 2015 03:00 AM2015-08-19T03:00:41+5:302015-08-19T03:00:41+5:30
बनावट पॅनकार्ड बनवून त्याआधारे वेगवेगळे गैरव्यवहार करणारी टोळी उपराजधानीत सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
उपराजधानीत अनेकांना गंडा : कित्येकांची फसवणूक
नरेश डोंगरे नागपूर
बनावट पॅनकार्ड बनवून त्याआधारे वेगवेगळे गैरव्यवहार करणारी टोळी उपराजधानीत सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या खळबळजनक प्रकारातून संबंधित व्यक्तीची बिनबोभाट आर्थिक फसवणूक केली जात आहे. दुसरे म्हणजे एखाद्या गंभीर गुन्ह्यात आरोपी म्हणून त्याला गोवले जाण्याचाही धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, अत्यंत गंभीर अशा या प्रकरणाची पुराव्यानिशी तक्रार करूनही पोलीस त्याकडे थंडपणे बघत असल्यामुळे वेगळाच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
काळे धन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहाराला प्रतिबंध घालण्यासाठी बँकांनी प्रत्येक खातेधारकाला पॅनकार्ड अनिवार्य केले आहे. अन्य महत्त्वाच्या कामासाठी अन् अधिकृत ओळखपत्र म्हणूनही पॅनकार्ड महत्त्वाचा पुरावा ठरतो आहे. विशेषत: कर्ज मिळवण्यासाठी पॅनकार्डची प्रत्येक वित्तीय संस्था अट घालते. त्यामुळे प्रत्येकच व्यक्ती पॅनकार्ड बनवून घेण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. प्रारंभी यूटीआय आणि इन्कम टॅक्स विभागातर्फे पॅनकार्ड उपलब्ध करून दिले जात होते. मात्र, पॅनकार्डची मागणी गेल्या काही वर्षांत अचानक वाढल्यामुळे ही जबाबदारी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटर लिमिटेड(एनएसडीएल)कडे सोपविण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली येथे एनएसडीएलचे मुख्यालय असून मुंबई, बेंगरूळू, चेन्नई आधी ठिकाणाहून पॅनकार्डची निर्मिती आणि वितरणाची प्रणाली कार्यरत असल्याचे सांगितले जाते.