सावध व्हा! आता ‘जीबीएस’ या दुर्मीळ आजाराने डोके वर काढले; खर्च जातो लाखांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 07:00 AM2021-10-30T07:00:00+5:302021-10-30T07:00:06+5:30
Nagpur News कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्या दहाच्या आत आली असताना ‘गुलियन बेरी सिंड्रोम’ (जीबीएस) या आजाराने डोके वर काढले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्या दहाच्या आत आली असताना ‘गुलियन बेरी सिंड्रोम’ (जीबीएस) या आजाराने डोके वर काढले आहे. दुर्मीळ असलेल्या या आजाराचे मेडिकलमध्ये तीन रुग्ण उपचाराखाली आहेत. हातापायातील ताकद जाऊन अंग लुळे पडण्याची लक्षणे असलेल्या या आजारावरील उपचार खर्चिक असल्याने रुग्णांचे नातेवाईक अडचणीत आले आहेत.
जानेवारीनंतर या आजाराचे आतापर्यंत शासकीयसह खासगी रुग्णलयात जवळपास १०० रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. परंतु तूर्तास तशी नोंद शासकीय दरबारी नाही. हवेवाटे या आजाराचा अज्ञात विषाणू शरीरात शिरतो आणि दीड दिवस ते दोन आठवड्यांच्या कालावधीत अंतर्गत अवयवांवर हल्ला चढवतो. त्यामुळे स्नायू व रक्तवाहिन्यांची ताकद कमी होते. रुग्ण उभे राहण्याची ताकदच गमावून बसतो. साधारण रुग्णाची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते. या रोगाचे तातडीने निदान व उपचाराची गरज असते. सिटी स्कॅनमधून संबंधित व्यक्तीला लकवा नसल्याचे निदान झाल्यानंतर रक्त तपासणी, नसांचे स्कॅनिंग, कमरेतील पाण्याचा अहवालातून ‘जीबीएस’चे निदान होते.
- एका महिलेसह दोन पुरुष रुग्ण
सध्या मेडिकलच्या अतिदक्षता विभागात नागपुरातील ५२ वर्षीय महिला व २० वर्षाचा तरुण तर २३ क्रमांकाच्या वॉर्डात मध्यप्रदेशातील ४० वर्षीय रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असले तरी महागड्या इंजेक्शनमुळे यांचे नातेवाईक मेटाकुटीस आले आहेत. हे इंजेक्शन मेडिकलमध्ये उपलब्ध नाही. बाहेर याचा तुटवडा असल्याचे रुग्णाच्या एका नातेवाईकाने सांगितले.
-इमिओग्लोब्युलेंटची द्यावी लागतात इंजेक्शन
‘जीबीएस’च्या रुग्णाला ‘इमिओग्लोब्युलेंट’ची इंजेक्शन द्यावी लागतात. याच्या ५ ग्रॅम इंजेक्शनची किमत १० हजार रुपये आहे. रुग्णाला वजनानुसार १०० ते १२० ग्रॅम इंजेक्शन द्यावे लागतात. त्याचा खर्च लाखांत जातो. मेडिकलमध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी सुरुवातीला स्वत:च्या खर्चाने हे इंजेक्शन विकत आणले परंतु नातेवाईकांना आता याचा खर्च झेपत नसल्याने त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत अर्ज केला आहे. लवकरच त्यांना हे इंजेक्शन या योजनेतून मिळण्याची शक्यता आहे.
-तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर
मेडिकलमध्ये ‘जीबीएस’ या दुर्मीळ आजारांचे तीन रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यातील दोन रुग्ण ‘आयसीयू’मध्ये आहे. जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात येते. औषधोपचाराने या आजाराचे रुग्ण बरे होतात.
- डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख औषध वैद्यकशास्त्र विभाग मेडिकल
- ही आहेत लक्षणे
: अंग दुखू लागणे
: चालताना तोल जाणे
: चेहरा सुजणे
: चावताना व गिळताना त्रास होणे
: हात व पाय लुळे पडणे