आता बचत गटांचे बनतील महासंघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:42 AM2019-02-11T10:42:20+5:302019-02-11T10:43:56+5:30
गावागावात पसरलेल्या महिला बचत गटांचा महासंघ बनणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने ग्रामीण जीवन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिला बचत गटांवर विशेष फोकस केले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल, यासाठी नवीन यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. यासाठी मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गावागावात पसरलेल्या महिला बचत गटांचा महासंघ बनणार आहे.
महिला बचतगटांना अतिशय कमी व्याजदरावर कर्ज देऊन त्यांना उद्योगशील बनविण्याचा प्रयोग सध्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू आहे़ आता शासनाने बचतगटांना कार्पोरेट क्षेत्राच्या अखत्यारित आणून त्यांना मार्केटिंगची जोड मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियानाचा विस्तार केला आहे़ नागपूर जिल्ह्यात ९ हजारावर बचत गट आहे.
सर्वप्रथम तालुक्यातील गटांचा महासंघ तयार करण्यात येणार आहे. महासंघामध्ये जिल्हा महाव्यवस्थापक, प्रशिक्षक, मार्केटिंग आणि कर्जपुरवठा अशी चार पदे राहणार आहे. सोबतीला आणखी चार व्यवस्थापक, तालुकास्तरावर एक आणि जि.प.च्या सर्कलनुसार एक व्यवस्थापक राहणार आहे.
यासर्व नियुक्त्या एमबीए पदवीप्राप्त संवर्गातील होणार आहे. सोबतच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कार्यरत अधिकाºयांचेही पद यात बदलणार आहे. ही नवीन यंत्रणा बचतगटांना व्यवसायाची तयारी, उत्पादन, विपणन पूर्व तयारी आणि विक्री, अशा सर्वस्तराची माहिती देणार आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांना थेट मिळणारा लाभ आहे, महासंघाद्वारे मिळणार आहे.
नागपूर विभागाची भरती प्रक्रिया शासनपातळीवरून २१ ते २२ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत आहे़ महिला बचतगट सक्षम आणि कार्पोरेट क्षेत्रातील उद्योगांच्या स्पर्धेत ते उतरावे, या हेतूने हा उपक्रम शासन राबवित आहे़
महिला सक्षमीकरणाची चळवळ मजबूत होईल
राज्यभरात महिला बचत गटांकडून चांगले काम होत आहे. या बचतगटांना मेक इन इंडियाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम शासन या उपक्रमातून करीत आहे़ बचतगटांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊन पोहोचेल़ महिला सक्षमीकरण चळवळ अधिक भक्कम होईल़
- डॉ़ मकरंद नेटके,
जिल्हा समन्वयक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा