आता हजला जाणारे विमान रिकामे परतणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:49 PM2019-06-21T12:49:54+5:302019-06-21T12:51:21+5:30
बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या एअर इंडियाचे उत्पन्न वाढविण्यासाठी एअर इंडियाने नवीन व्यवस्था केली आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या एअर इंडियाचे उत्पन्न वाढविण्यासाठी एअर इंडियाने नवीन व्यवस्था केली आहे. देशातून यावर्षी हज यात्रेला जाणारे विमान हाजींना जेद्दाह व मदिना सोडून रिकामे परत येणार नाही. या विमानांचा परतताना शेड्यूल्ड फ्लाईटमध्ये समावेश करण्यात येईल. देशात पहिल्यांदा असा प्रयोग करण्यात येत आहे. त्याचा फायदा एअर इंडियाला होणार आहे.
एअर इंडिया यावर्षी हज यात्रेसाठी बार वाईड बॉडी जम्बो जेट ७४७ चा समावेश करणार आहे. यावर्षी एअर इंडियाला हज यात्रेतून उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. हज यात्रा विमान कंपन्यांसाठी एक संधी आहे. या कालावधीत लाखोच्या संख्येने लोक विदेश प्रवास करतात. विशेष म्हणजे या प्रवासाचे भाडे प्रवास सुरू होण्यापूर्वीच जमा होते. उल्लेखनीय म्हणजे सौदी हज टर्मिनलशी झालेल्या करारानुसार शेड्यूल्ड फ्लाईट आॅपरेट करता येऊ शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत भारतातून हज यात्रेकरूंना सोडल्यानंतर विमान रिकामे परतत होते. त्यामुळे विमान कंपन्यांचे नुकसान होत होते. परंतु यावर्षी सरकारतर्फे सौदी अरबमधून शेड्यूल्ड फ्लाईट चालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांच्या मते, सौदी अरबच्या विमान कोट्याच्या आधारे ही व्यवस्था करण्यात येऊ शकते.
नागपुरातून हजचे ३४० क्षमतेचे पहिले विमान २५ जुलैला उडणार आहे, तर शेवटचे विमान ३१ जुलैला उडणार आहे. तर २६ ते २९ जुलैदरम्यान १८० व ३२० क्षमतेचे विमान उडणार आहे.
विमानाच्या मेंटेनन्सला आला वेग
हज यात्रेसाठी नागपूर एम्बार्केशन पॉर्इंटवरून यावर्षी २५ जुलैला प्रवास सुरू होईल. ३१ जुलैला शेवटचे विमान उडेल. नागपुरातून मोठ्या प्रमाणात हज यात्री प्रवास करीत असल्याने एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. (एआयईएसएल) च्या कार्याला वेग आला आहे. हजसाठी उडणाऱ्या विमानांच्या मेंटेनन्सला प्राथमिकता देण्यात येत आहे.
आमचे प्रयत्न सुरू आहे
यावर्षी एअर इंडियाचे भारतातून हजसाठी उडणारे विमान सौदीवरून परतताना शेड्यूल्ड फ्लाईटमध्ये त्याचा समावेश व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत हजची फ्लाईट चार्टर फ्लाईटच्या रूपात होती. यावर्षी भारतातून हजसाठी दोन बोर्इंग ७७७, दोन जम्बो जेट ७४७, तीन बोर्इंग ७८७ व एअरबस ३२० सुद्धा सोडण्यात येईल.
-एच.आर. जगन्नाथ, सीईओ, एआयईएसएल, नागपूर