आता लक्ष उत्पन्न वाढीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:09 AM2020-12-22T04:09:29+5:302020-12-22T04:09:29+5:30
जलालखेडा: पाणी फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत नरखेड तालुक्यातील उमठा या गावाला राज्यस्तरीय पुरस्कार दोन वर्षापूर्वी मिळाला ...
जलालखेडा: पाणी फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत नरखेड तालुक्यातील उमठा या गावाला राज्यस्तरीय पुरस्कार दोन वर्षापूर्वी मिळाला होता. या गावाला पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजीत भटकर यांनी अलीकडेच भेट देत येथील जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. जलसंधारणाच्या कामामुळे येथील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. आता गावकऱ्यांनी येथेच न थांबता गावाचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा. यासाठी करावयाच्या विविध विषयांवर भटकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. येथे गावकऱ्यांनी सीताफळाची बाग लावली आहे. त्यातून गावाचे उत्त्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. त्यांनी फळबागेची पाहणी करीत यातून मिळणाऱ्या उत्पादनाची विक्री कशी करता येईल व कशाप्रकारे जास्त भाव मिळतील याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी पाणी फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक सत्यवान देशमुख, हेमंत पिकलमुंडे, उमठ्याचे माजी सरपंच प्रवीण दहेकार, डॉ. विघे, डॉ. मनोज वर्मा, सुभाष चौधरी, विजय निंबूरकार व गावकरी उपस्थित होते.