आता प्रवाशांच्या आवडीनुसार रेल्वेगाड्यांत मिळणार खाद्यपदार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 06:50 PM2022-11-17T18:50:40+5:302022-11-17T18:52:32+5:30
Nagpur News विविध राज्यांतील प्रवाशांना आवडत असलेले खाद्यपदार्थ त्यांना रेल्वे प्रवासात मिळावेत यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नागपूर : रेल्वेने प्रवास करताना यापूर्वी आयआरसीटीसीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजनात मोजक्या पदार्थांचा समावेश करण्यात येत होता; परंतु विविध राज्यांतील प्रवाशांना आवडत असलेले खाद्यपदार्थ त्यांना रेल्वे प्रवासात मिळावेत यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, प्रवाशांना त्यांच्या प्रादेशिक गरजेनुसार खाद्यपदार्थ पुरविण्याची मंजुरी आयआरसीटीसीला (भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ) देण्यात आली आहे.
प्रीपेड प्रकारच्या रेल्वेगाड्यांच्या तिकिटांमध्ये प्रवास शुल्कासोबत खानपान सेवेचे शुल्कदेखील समाविष्ट असते. अशा वेळी आधी सूचित केलेल्या शुल्कामध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ आयआरसीटीसी निश्चित करणार आहे. याशिवाय इतर मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आधी सूचित केलेल्या ठरावीक शुल्कामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रमाणित जेवण थाळीसारख्या मर्यादित खर्चाच्या पदार्थांची निवड आयआरसीटीसीद्वारे करण्यात येणार आहे.
जनता गाड्यांमधील जेवणाची पदार्थसूची आणि शुल्क यांच्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच स्वतंत्रपणे मागविल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांसाठी पदार्थसूची आणि त्याचे शुल्क आयआरसीटीसीतर्फे निश्चित करण्यात येणार आहे. रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या खान-पान सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसीला अन्नपदार्थांच्या यादीतील पदार्थ ठरविण्याची परवानगी दिली आहे.
त्यानुसार प्रादेशिक पातळीवरील वैशिष्ट्य असलेले किंवा प्राधान्य दिले जाणारे खाद्यपदार्थ, विविध ऋतूंत बनविल्या जाणाऱ्या पाककृती, सणासुदीच्या काळात मागणी असलेले पदार्थ, मधुमेहाच्या प्रवाशांना लागणारे भोजन, लहान मुलांना आवश्यक असलेले खाद्यपदार्थ, भरडधान्यावर आधारित स्थानिक खाद्यपदार्थ, आरोग्यदायी खाद्यपदार्थ आदींचा समावेश प्रवाशांच्या जेवणात व्हावा या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. यात भोजनाचे शुल्क सुसंगत असावे, खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला असावा, खाद्यपदार्थ ठरविण्यापूर्वी रेल्वे विभागाला त्याची माहिती देण्याची अट रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसीला घातली आहे. त्यामुळे आता लवकरच रेल्वे प्रवासात प्रवाशांना आयआरसीटीसीच्या माध्यमातून त्यांच्या प्रदेशातील लोकप्रिय खाद्यपदार्थ खाण्यास मिळणार आहेत.
.................