आता चारही सिग्नल अर्धा मिनिट बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 12:25 AM2018-11-09T00:25:47+5:302018-11-09T00:26:54+5:30
सिग्नल बंद असताना आणि सिग्नल सुरू होताच वाहनचालकांकडून वाहन पळविण्याची घाई करण्यात येते. त्यामुळे पायी रस्ता ओलांडणारांना वाहनांचा कट लागून नेहमी अपघात होतात. ते टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अभिनव उपाययोजना केली आहे. खास पायी रस्ता ओलांडणारांसाठी आता व्हेरायटी चौकातील चारही सिग्नल एकाच वेळी ३० सेकंदासाठी बंद केले जातील. या अर्ध्या मिनिटात चारही सिग्नल लाल राहतील अन् ही वेळ फक्त पायी चालणारांसाठी राखीव राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी आज पत्रकारांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिग्नल बंद असताना आणि सिग्नल सुरू होताच वाहनचालकांकडून वाहन पळविण्याची घाई करण्यात येते. त्यामुळे पायी रस्ता ओलांडणारांना वाहनांचा कट लागून नेहमी अपघात होतात. ते टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अभिनव उपाययोजना केली आहे. खास पायी रस्ता ओलांडणारांसाठी आता व्हेरायटी चौकातील चारही सिग्नल एकाच वेळी ३० सेकंदासाठी बंद केले जातील. या अर्ध्या मिनिटात चारही सिग्नल लाल राहतील अन् ही वेळ फक्त पायी चालणारांसाठी राखीव राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी आज पत्रकारांना दिली.
शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधार करण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्यातीलच एक म्हणून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. बरेच वेळा वाहनचालक पायी चालणारांचा विचारच करीत नाही. प्रत्येक बाजूच्या वाहनचालकाला सिग्नल सुरू होताच आपले वाहन दामट्याची घाई झाली असते. त्यामुळे पायी चालणारे,विशेषत: वृद्ध नागरिकांना त्याचा मोठा त्रास होतो. अनेकदा अपघातही घडतात. ते टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी व्हेरायटी चौकात प्रायोगित तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झांशी राणी चौकातही असाच प्रयोग करण्यात येणार आहे. त्यानुसार, १२९ सेकंदानंतर चारही सिग्नल्स एकाच वेळी लाल होतील. ३० सेकंद ते लाल राहतील. या वेळेत कोणत्याही दिशेला उभा असलेले पायी चालणारे रस्ता ओलांडू शकतील. या वेळेत चौकातून कोणत्याही दिशेने वाहन धावणार नाही. सिग्नलच्या खांबावर असलेल्या ध्वनिक्षेपकातून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना हिंदी आणि मराठीतून पोलीस सूचनाही देतील. त्याचप्रमाणे चारही सिग्नल लाल होईस्तोवर पादचाºयांना रस्त्याच्या बाजूला थांबण्याच्या सूचना मेगाफोनद्वारे वाहतूक पोलीस करणार आहेत. बुधवारपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी उपायुक्त रोशन यांनी केले.
मोबाईलवर डीजी लॉकर
वाहनचालकांना वाहनांची कागदपत्रे आणि चालक परवाना सोबत बाळगण्याची यापुढे गरज नाही. मोबाईलवर डीजी लॉकर हे अॅप डाऊनलोड करून त्यामध्ये वाहनांची कागदपत्रे आणि चालकाचा परवाना सेव्ह केला जाऊ शकतो. गरज पडल्यास वाहतूक पोलिसांना ते दाखवता येते. कागदपत्र तपासण्यासाठी वाहतूक पोलीस सहकाऱ्यांना (पोलीस मित्रांना) सोबत ठेवतात. ही मंडळी लाच घेण्याचे काम करीत असल्याचा आरोप होतो, असे निदर्शनास आणून दिले असता अशा कर्मचाऱ्याचा थेट फोटो पाठवून तक्रारी करण्याचे आवाहन उपायुक्त रोशन यांनी केले. हप्तेखोर पोलिसांमुळे अनेक भागातून आॅटो तसेच खासगी वाहनचालक मनमानी पद्धतीने तसेच अवैध वाहतूक करतात, हा मुद्दा उपस्थित झाला असता संबंधितांकडून तक्रार आल्यास ठोस कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त रोशन म्हणाले. लाचखोरांची गय केली जाणार नाही. आतापर्यंत १० वादग्रस्त पोलीस कर्मचारी मुख्यालयात पाठविण्यात आले तर काहींची गुप्त चौकशी सुरू असल्याचेही रोशन यांनी पत्रकारांना सांगितले.