सोलर रूफ टॉपद्वारे आता १३५९ मेगावॅट विजेचे उत्पादन; राज्यातील ७६,८०८ ग्राहकांनी घेतला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 04:51 PM2023-01-28T16:51:50+5:302023-01-28T16:54:13+5:30
मागील दहा वर्षांत सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांची संख्या २०,७२२ ने वाढली
नागपूर : राज्यातील ७६,८०८ वीज ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सोलर रूफ पॅनल लावून १३५९ मेगावॉट वीज उत्पादन क्षमता विकसित केली आहे. त्यातून विजेची गरज पूर्ण होत असून अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळत आहे.
महाविततरणचे अध्यक्ष व प्रबंध निदेशक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, महावितरणच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाच वर्षांपूर्वी २०१६-१७ मध्ये केवळ १०७४ ग्राहक सोलर रूफ टॉपच्या माध्यमातून २० मेगावॉट विजेचे उत्पादन करत होते. आता ग्राहकांची संख्या वाढून ७६,८०८ झाली आहे. या माध्यमातून १३५९ मेगावॉट विजेचे उत्पादन केले जात आहे. २०२१-२२ मध्ये सौरऊर्जा उत्पादन एक हजार मेगावॉटपेक्षा अधिक झाले आहे. मागील दहा वर्षांत सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांची संख्या २०,७२२ ने वाढली आहे. या ग्राहकांकडे ३३१ मेगावॉट वीज उत्पादनाची क्षमता आहे.
सोलर रूफ टॉप लावणाऱ्या योजनेंतर्गत ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. तीन किलोवॉट क्षमतेचे पॅनल लावण्यासाठी १.२० लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे परंतु केंद्र सरकार ४८ हजार रूपये (४० टक्के) अनुदान देते. अशा परिस्थितीत खर्च केवळ ७२ हजार रूपये येतो. सौरऊर्जेमुळे वीज उत्पादनासाठी परंपरागत विजेचा उपयोग कमी होतो. वीज बिलात कपात होते. अतिरिक्त वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये जाते. महावितरण या विजेचे पैसे बिलाच्या माध्यमातून परत करते. अनेक ग्राहकांचे वीज बिल यामुळे शून्यसुद्धा आले आहे. सोलर पॅनल लावण्याचा खर्च चार ते पाच वर्षात वसूल होतो.