आता घरोघरी दारांवर मुलींच्या नावाच्या पाट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 08:45 PM2020-02-07T20:45:24+5:302020-02-07T20:55:09+5:30
१ जानेवारी २०२० पासून जन्म झालेल्या मुलींच्या घरावर तिच्या नावाची पाटी लावून घराला तिची ओळख देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी घराघरातून मुलींच्या बाबतीत सन्मानाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील घराघरातून मुलींना हा सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न महिला व बाल कल्याण विभाग करीत आहे. १ जानेवारी २०२० पासून जन्म झालेल्या मुलींच्या घरावर तिच्या नावाची पाटी लावून घराला तिची ओळख देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
मुलींचा जन्मदर व शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी केंद्र सरकारने २० ते २६ जानेवारीदरम्यान ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा सप्ताह साजरा केला. या अंतर्गत मुली, महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात ज्या घरात १ जानेवारी २०२० नंतर जन्म झाला. त्यांच्या घरी बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी जाऊन तिच्या नावाची पाटी लावली. मुलीच्या पालकांना मार्गदर्शन करून पाटी लावण्यामागची भूमिका पटवून सांगितली. जन्मलेल्या मुलींच्या नावाने पाटी लावल्याने त्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त केला. समाजात विशेष करून ग्रामीण भागात घराला पुरुषांच्या नावाची पाटी लावून पुरुषांची ओळख देण्यात येते. मात्र या परंपरेला महिला व बाल कल्याण विभागाने फाटा देत मुली व महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाभर हा उपक्रम राबविण्यात आला असून, याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
मुलींच्या नावाने लावले झाड
या अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्ये जन्म झालेल्या मुलींच्या नावाने तिच्या घरी अथवा परिसरात तिच्या नावाने एक वृक्षसुद्धा लावण्यात आले. त्याचबरोबर माता आणि मुलीचा ग्रामस्तरावर सत्कारसुद्धा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या सन्मानाचा विचार होत आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारामुळे मुलींना आता सन्मानाची वागणूकही मिळायला लागली आहे. त्यामुळे २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत सध्या ९७१ मुलींचा जन्मदर झाला. हे उपक्रम त्याला कारणीभूत ठरत आहे.
भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग,जि.प.