आता तरी इन्टर्न डॉक्टरांना विमा कवच द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:01+5:302021-06-01T04:07:01+5:30
नागपूर : कोरोना रुग्णांना सेवा देणारे इन्टर्न डॉ. राहुल पवार यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे पुन्हा एकदा इन्टर्न डॉक्टरांच्या विमा ...
नागपूर : कोरोना रुग्णांना सेवा देणारे इन्टर्न डॉ. राहुल पवार यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे पुन्हा एकदा इन्टर्न डॉक्टरांच्या विमा सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी मेडिकलच्या इन्टर्न डॉक्टरांनी ‘असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इन्टर्न्स’च्यावतीने काळी फित बांधून डॉ. पवार यांना श्रद्धांजली वाहिली. इन्टर्न डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
‘असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इन्टर्न्स’चे उपाध्यक्ष डॉ. शुभम नागरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, लातूर येथील मेडिकलमध्ये इन्टर्न असलेले डॉ. राहुल पवार खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा होते. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांना सेवा दिली; परंतु यात त्यांचा मृत्यू झाला. इन्टर्न डॉक्टरांना शासनातर्फे कोणतेही विमा कवच नसल्याने डॉ. पवार यांच्यावर वर्गणी गोळा करून उपचार करण्याची वेळ आली; मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या व मोलमजुरी करणाऱ्या पवार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कोरोना रुग्णांना सेवा देत असताना इन्टर्न डॉक्टरांना कोरोना मानधन व विमा सुरक्षेपासून दूर ठेवले आहे. यासह इतरही मागण्यांसाठी मेयो, मेडिकलच्या ३५० इन्टर्न डॉक्टरांनी १ मार्चपासून कामबंद आंदोलन उभारले होते. चार दिवसांच्या आंदोलनानंतर पालकमंत्री व मनपा आयुक्त यांनी मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले. आंदोलन मागे घेतले; परंतु आता महिन्याभराचा कालावधी होत असताना मागण्या पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. इन्टर्न डॉक्टरांमध्ये रोष वाढत चालला आहे. यामुळे आता पुन्हा आंदोलन उभारण्याची शक्यता आहे, असा इशाराही डॉ. नागरे यांनी दिला.