आता घरोघरी जाऊन लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:11 AM2021-08-19T04:11:37+5:302021-08-19T04:11:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना सुरक्षेचा एकच विकल्प, ‘मिशन लसीकरण हा संकल्प’ या अभियानाचा प्रारंभ सद्भावना दिनी म्हणजेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना सुरक्षेचा एकच विकल्प, ‘मिशन लसीकरण हा संकल्प’ या अभियानाचा प्रारंभ सद्भावना दिनी म्हणजेच २० ऑगस्टपासून होत आहे. ‘प्रत्येक घराची वारी, लसीकरण तुमच्या दारी’ यानुसार नागपूर व अमरावती विभागात विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील अकरा जिल्ह्यांतील १२० तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन लसीकरण’ अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या २०० वाहनांचे हस्तांतरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी राहतील. तसेच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील सर्व पालकमंत्री प्रामुख्याने उपस्थित राहतील.
जे रुग्ण बेडवरून उठू शकत नाहीत अशांना लस मिळावी यासाठी लसीकरण वाहने प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, आकस्मिक आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय चमूस रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा तसेच अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी म्हटले आहे.
- बॉक्स
विदर्भात १५ ऑगस्टपर्यंत ९४.१४ लाख लोकांचे लसीकरण
नागपूर व अमरावती विभागात १५ ऑगस्टपर्यंत ९४ लाख १४ हजार ८२० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस ७२ लाख ८१ हजार ६६५, तर दुसरा डोस २४ लाख ५३ हजार ४४० नागरिकांनी घेतला आहे. नागपूर व अमरावती विभागात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मिशन लसीकरण ही मोहीम राबविण्यात येत आहे.