आता राज्यात ‘शिवशाही’ने जा, तुम्हाला आवडेल तिथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:04 AM2017-12-09T10:04:24+5:302017-12-09T10:05:44+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांचा प्रवास सुखकारक व आरामदायी व्हावा यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली असून आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेंतर्गत प्रवाशांना आता शिवशाही बसने प्रवास करता येणार आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांचा प्रवास सुखकारक व आरामदायी व्हावा यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली असून आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेंतर्गत प्रवाशांना आता शिवशाही बसने प्रवास करता येणार आहे.
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेनुसार सात दिवस आणि चार दिवसांचा पास काढून प्रवाशांना वातानुकूलित बसने प्रवास करता येणार आहे. या योजनेंतर्गत पास काढून प्रवाशांना शिवशाही आसनी बसने प्रवास करता येणार असून शिवशाही शयन बससेवेतून या पासवर प्रवास करता येणार नाही. या योजनेत गर्दीचा हंगाम १५ आॅक्टोबर ते १४ जून आणि कमी गर्दीचा हंगाम १५ जून ते १४ आॅक्टोबर या दोन कालावधींसाठी राहणार आहे. यात प्रौढ आणि मुले यांच्यासाठी दोन वेगवेगळे दर आकारण्यात येणार आहेत. शिवशाही आसनी बससाठी गर्दीच्या हंगामात सात दिवसांच्या पासचे मूल्य प्रौढांसाठी १७८० रुपये, मुलांसाठी ८९० रुपये, कमी गर्दीच्या हंगामात प्रौढांसाठी १६४५, मुलांसाठी ८२५ रुपये राहील. शिवशाही आसनी बस चार दिवसांच्या पाससाठी गर्दीच्या हंगामात प्रौढांसाठी १०२० रुपये, मुलांसाठी ५१०, कमी गर्दीच्या हंगामात प्रौढांसाठी ९४०, मुलांसाठी ४७० रुपये राहील.
तर शिवशाही आंतरराज्य मार्गासाठी सात दिवसांच्या पासचे गर्दीच्या हंगामासाठी मूल्य प्रौढांसाठी १९२० रुपये, मुलांसाठी ९६० रुपये, तर कमी गर्दीच्या हंगामासाठी प्रौढांसाठी १७८० रुपये, मुलांसाठी ८९० रुपये राहील.
चार दिवसांच्या पासचे मूल्य गर्दीच्या हंगामात प्रौढांसाठी ११०० रुपये, मुलांसाठी ५५० रुपये, कमी गर्दीच्या हंगामात प्रौढांसाठी १०२०, मुलांसाठी ५१० रुपये राहील. ज्या मार्गावर शिवशाही वातानुकूलित बससेवा नाही त्या ठिकाणी निम्न दर्जाच्या बससेवेसाठी साधी, जलद, रात्रसेवा, मिडीबस, निम आराम बसमध्ये ही पास वैध राहणार आहे.
आंतरराज्य मार्गावरील पास महाराष्ट्रात वैध राहणार आहे. शिवशाही बसेस मागणीनुसार प्रासंगिक करारावर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी गर्दीचा हंगाम आणि कमी गर्दीचा हंगाम असे वेगळे दर ठेवण्यात आलेले नाहीत. प्रवाशांनी पुणे, भंडारा, अमरावती, यवतमाळ या मार्गावर सुरू असलेल्या शिवशाही वातानुकूलित बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई यांनी केले आहे.