आता कोरोना लसीची ‘हेटेरोजीनस् ट्रायल’; हातावर व नाकावाटे दिली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 08:10 AM2021-09-12T08:10:00+5:302021-09-12T08:10:01+5:30
Nagpur News कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक या सर्व लसी इंजेक्शनमधून दिल्या जात आहेत. आता लवकरच त्या ‘हेटेरोजीनस्’ पद्धतीनेसुद्धा दिल्या जाणार आहेत.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संकटावर मात करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. या सर्व लसी इंजेक्शनमधून दिल्या जात आहेत. आता लवकरच ‘हेटेरोजीनस्’ पद्धतीने सुद्धा दिली जाणार आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ही पद्धत प्रभावी ठरणार असल्याने भारतात नागपूरसह लखनऊ, बेळगाव, हैद्राबाद या ठिकाणी मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे. (Now the ‘heterogeneous trial’ of the corona vaccine)
देशात कोरोना लसीसंदर्भात बरेच प्रयोग सध्या सुरू आहेत. इंजेक्शनद्वारे देण्यात येणाऱ्या लसीव्यतिरिक्त नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची चाचणी सुरू आहे. हैद्राबादच्या भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मानवी चाचणी महाराष्ट्रात केवळ नागपुरातील गिल्लुरकर हॉस्पिटलमध्ये झाली. डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांच्या मार्गदर्शनात या चाचणीचे दोन्ही टप्पे यशस्वी पार पाडले. त्यानंतर नाकावाटे देण्यात येणाऱ्या ‘नेझल व्हॅक्सिन’ चाचणीचा पहिला टप्पा याच हॉस्पिटलमध्ये पूर्ण होऊन त्याचे चांगले निष्कर्ष पुढे आले आहेत. याचा दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची मंजुरीची प्रतीक्षा असताना भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा ‘हेटेरोजीनस् ट्रायल’ला ‘केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरल’ने मंजुरी दिली आहे.
-काय आहे ‘हेटेरोजीन स्ट्रायल’
डॉ. गिल्लूरकर यांनी सांगितले, कोरोनाची एकच लस दोन वेगवेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रकाराला ‘हेटेरोलोगस’ किंवा ‘हेटेरोजीनस्’ म्हटले जाते. भारतात केवळ ‘इन्ट्रामस्क्युलर’ म्हणजे इंजेक्शनद्वारे कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. ‘नेझल व्हॅक्सिन’ला अद्याप मंजुरी मिळाली नाही. ‘हेटेरोजीनस् ट्रायल’मध्ये एक लस नाकावाटे तर दुसरी लस इंजेक्शनद्वारे दिली जाते.
-२०० स्वयंसेवकावर होणार चाचणी
नागपुरातील गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या चाचणीला शुक्रवारपासून सुरुवात झाल्याचे सांगत डॉ. गिल्लूरकर म्हणाले, भारतातील चारही सेंटरवर प्रत्येकी ५० असे एकूण २०० स्वयंसेवकावर ही चाचणी होत आहे. १८ ते ६० वयोगटात होणारी ही चाचणी चार गटात विभागण्यात आली आहे. पहिल्या गटात १३ स्वयंसेवकांना पहिली लस नाकावाटे तर २८ दिवसांनी दुसरी लस इंजेक्शनद्वारे दिली जाईल. दुसऱ्या गटात १३ स्वयंसेवकांना पहिली लस इंजेक्शनद्वारे तर दुसरी लस नाकावाटे, तिसऱ्या गटात १२ स्वयंसेवकांना दोन्ही लस नाकावाटे तर चौथ्या गटात १२ स्वयंसेवकांना दोन्ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाईल. याचा अभ्यास करून निष्कर्ष काढला जाईल.
-तिसऱ्या लाटेला रोखण्यात प्रभावी ठरणार!
‘हेटेरोजीनस् ट्रायल’ प्राण्यांमध्ये खूप यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे, नाकावाटे दिलेल्या लसीमुळे कोरोनाचा विषाणूला तत्काळ नाकातच रोखण्यात यश येते तर दुसऱ्या डोस हा इंजेक्शनने दिल्यामुळे लांब कालावधीपर्यंत त्याचा प्रभाव दिसून येतो. यामुळे तिसऱ्या लाटेला रोखण्यात ही पद्धत यशस्वी ठरण्याची दाट शक्यता आहे.
-डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर, संचालक गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर