आता कसं गार गार वाटतंय... हा ‘कूलर’ तुमच्या घरातील तापमान १५ डिग्रीपर्यंत कमी करेल!

By मंगेश व्यवहारे | Published: May 31, 2024 06:12 AM2024-05-31T06:12:43+5:302024-05-31T06:13:24+5:30

नागपूर शहरात ‘ग्रीन नेट शेड मंगल मंडप’ संकल्पनेतून साकारलाय ‘क्लायमेट कूलर’

Now how cool does it feel... This 'cooler' will reduce the temperature in your home by up to 15 degrees! | आता कसं गार गार वाटतंय... हा ‘कूलर’ तुमच्या घरातील तापमान १५ डिग्रीपर्यंत कमी करेल!

आता कसं गार गार वाटतंय... हा ‘कूलर’ तुमच्या घरातील तापमान १५ डिग्रीपर्यंत कमी करेल!

मंगेश व्यवहारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: शहरात तापमान ४३ वर पोहोचले आहे. घराबाहेरच नाही तर घरातही राहणे असह्य झाले आहे. कूलर, एसीही काम करेनासे झाले आहेत. घरात राहूनही घामाच्या धारांनी नागपूरकर हैराण झाले आहेत. अशात शहरातील प्रकाश गोविंदवार यांच्या ग्रीन नेट शेड मंगल मंडप या संकल्पनेतून घरातील तापमान १५ डिग्रीपर्यंत कमी होण्यास मदत झाली आहे. त्यांनी या संकल्पनेला ‘क्लायमेट कूलर’ असेही संबोधले आहे.

...आता कूलर देतोय थंडगार वारा

शहराचे सिमेंटीकरण झाले आहे. सिमेंट लवकर गरम होते आणि थंड व्हायला ८ ते १० तास लागतात. त्यामुळेच रात्रीही  उष्णता जाणवते.  ग्रीन नेट शेड मंगल मंडप या संकल्पनेतून घराचे तापमान कमी होण्यास मदत होते. प्रवीण अभंगे यांच्या घराच्या छतावर ही संकल्पना साकारण्यात आली आहे.

लोकमत प्रतिनिधी भर दुपारी ४३ डिग्री तापमानात त्यांच्या घराच्या छतावर गेले. तेथे उन्हाची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव आला. त्यांनी ६०० चौरस फुटांच्या छतावर लोखंडी शेड तयार केले. त्या शेडला ग्रीन नेट बांधली आणि छतावर टेरेस गार्डन तयार केले. यात फुलांची, फळांची झाडे लावली. त्याचा परिणाम म्हणजे घरामध्ये तापमान कमी झाल्याचे जाणवले.

पूर्वी उन्हाळ्यात कूलर लावूनही घरात गरम व्हायचे. आता कूलरही गार वारा द्यायला लागला आहे. सकाळी १० वाजेपर्यंत एक फॅन सुरू असला तरी चालते. प्रकाश गोविंदवार यांच्या मार्गदर्शनातून ही संकल्पना साकारली आहे. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येतोय, असे अभंगे यांनी सांगितले.

क्लायमेट कूलर काय करतो?

हा क्लायमेट कूलर घरातील वॉटर कूलरसारखेच काम करतो. छतावर लावलेल्या ग्रीन नेटमुळे सूर्यकिरणे थेट छतावर पडत नाहीत आणि तापमान अर्ध्यावर येते. शिवाय सावली पसरल्याने छत गरमच होत नाही. टेरेस गार्डन तापमान कमी करण्यास मदत करते. शिवाय वातावरणातील कार्बनही शोषून घेते. त्यामुळे छत गरम होत नाही, असे गोविंदवार म्हणाले. 

उद्याने आणि घरातील झाडे सोडल्यास रस्ते उजाड होऊन शहर सिमेंटचे झाले आहे. त्यामुळेच तापमान सहन होत नाही; पण टेरेसवर ग्रीन नेट शेड संकल्पना साकारल्यास शहरात मोठा ग्रीन पॅच निर्माण होऊ शकतो.
-प्रकाश गोविंदवार, जलवायू परिवर्तनाचे अभ्यासक

Web Title: Now how cool does it feel... This 'cooler' will reduce the temperature in your home by up to 15 degrees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.