आता ‘कोविशिल्ड’ची मानवी चाचणीही नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 08:36 AM2020-09-20T08:36:13+5:302020-09-20T08:36:53+5:30
‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अॅस्टॅजेनका’ आणि पुण्याची ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन निर्माण केलेली आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या मेडिकलला परवानगी मिळाली आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अॅस्टॅजेनका’ आणि पुण्याची ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन निर्माण केलेली आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या मेडिकलला परवानगी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात १०० व्यक्तींवर ही चाचणी के ली जाणार असून पुढील आठवड्यापासून याच्या रीतसर नोंदणीला सुरुवात होणार आहे.भारतात तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा नागपुरात सुरू झाला असताना आता ‘कोविशिल्ड’ चाचणीला सुरुवात होणार असल्याने नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोरोनाविरोधातील लसनिर्मिती निर्णायक टप्प्यावर आहे. विशेषत: ‘कोविशिल्ड’ लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. याची चाचणी १७ केंद्रामधील १६०० नागरिकांवर २२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये, प्रत्येक केंद्रातील सुमारे १०० नागरिकांवर कोरोना लसची चाचणी घेण्यात येत आहे. आता यात नागपूरचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयही (मेडिकल) जुळले आहे.
सुरक्षितता व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता तपासणार
मेडिकलच्या पल्मनरी मेडिसीनचे विभाग प्रमुख, कोविड हॉस्पिटल आयसीयूचे इन्चार्ज व ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’शी करार करून सीरम इन्स्टिट्यूटतर्फे या लसीची निर्मीती केली जाणार आहे. ‘आयसीएमआर’च्या निगराणी खाली नागपूर मेडिकलला लसीची मानवी चाचणी होणार आहे. दिल्ली एम्ससह राज्यात पुणे, मुंबई येथे चाचणी सुरू आहे. ‘फेज टू बाय थ्री’मध्ये मेडिकलमध्ये होणाऱ्या या चाचणीत लसीची सुरक्षितता व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता तपासली जाणार आहे. या चाचणीतसह अन्वेषक म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. शिल्पा गुप्ता, डॉ. सुशांत मुळे, डॉ. रवी यादव, व डॉ. अलिना अलेक्झांडर आदींचा समावेश आहे. मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांचेही यात सहकार्य मिळाले आहे.
२८व्या दिवशी दुसरा डोज
‘कोविशिल्ड’ मानवी चाचणीत १८ ते ६० वयोगटातील निरोगी व्यक्तीची निवड केली जाणार आहे. सुरूवातीला १०० व्यक्तींवर ही चाचणी होणार आहे. पहिला डोज दिल्यानंतर २८ व्या दिवशी दुसरा डोज दिला जाणार आहे. त्यानंतर ५६ व्या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी होईल, ९० व्या दिवशी त्यांची फोनवरून चौकशी केली जाईल आणि १८० व्या दिवशी त्यांची पुन्हा हॉस्पिटलमध्ये तपासणी केली जाईल. या दरम्यान त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत लागली तर त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
-डॉ. सुशांत मेश्राम प्रमुख अन्वेषक,
कोविशिल्ड चाचणी -मेडिकलसाठी गौरवाची बाब
‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अॅस्टॅजेनका’ आणि पुण्याची ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन तयार के लेल्या लसीची मानवी चाचणीसाठी मेडिकलला परवानगी मिळणे ही गौरवाची बाब आहे. मेडिकलमध्ये ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’अंतर्गत प्लाझ्मा थेरपी व इतरही महत्त्वाच्या औषधांच्या चाचण्या सुरू आहेत. याचा फायदा नक्कीच रुग्णाला होणार आहे.
-डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल