आता नागपूरच्या एम्समध्ये संशयित ‘मंकीपॉक्स’ची चाचणी; राज्यातील नमुने तपासणार
By सुमेध वाघमार | Published: August 27, 2024 08:37 PM2024-08-27T20:37:50+5:302024-08-27T20:38:02+5:30
मंकीपॉक्स हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. मानवी आरोग्यासाठी तो धोकादायक ठरू शकतो.
नागपूर : महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘एम्स’च्या ‘व्हायरल रिसर्च डायग्नोसिस लॅबोरेटरी’ला मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांची चाचणीसाठी ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) व ‘डिपार्टमेंट आॅफ हेल्थ रिसर्च’ने (डीएचआर) अधिकृत केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नागपूरसह महाराष्ट्रातील संशयित रुग्णांची वेळीच चाचणी होऊन आजाराच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
मंकीपॉक्स हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. मानवी आरोग्यासाठी तो धोकादायक ठरू शकतो. या आजाराचे तातडीने निदान करून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी चाचणी सुविधांची गरज होती. ‘एम्स’च्या ‘व्हायरल रिसर्च डायग्नोसिस लॅबोरेटरी’ने या संदर्भात मोठे पाऊल उचलत, महाराष्ट्रातील नागरिकांना जलद आणि अचूक चाचणी सेवा प्रदान करण्यास मंगळवारपासून सुरुवात केली.
-भारतात ‘मंकीपॉक्स’ची ३० प्रकरणे
१४ आॅगस्ट २०२४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्स विषाणूच्या नवीन ‘स्ट्रेन’च्या उदयामुळे ‘पब्लिक हेल्थ इमर्जन्सी आॅफ इंटरनॅशनल कन्सर्न’ (पीएचइआयसी) घोषित केले. या वर्षी, १५ हजार ६०० नोंदवलेल्या प्रकरणांपैकी ५३७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतात, मार्च २०२४ मध्ये केरळमध्ये झालेल्या मृत्यूसह मंकीपॉक्सची एकूण ३० प्रकरणे नोंदविण्यात आली.
-चाचणीमुळे आजारावर नियंत्रण
‘एम्स’चे संचालक प्रा. डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले की, चाचणी सुुविधेमुळे आजाराच्या प्रसारावर जलद नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे शक्य होईल. देशभरातील मंकीपॉक्सच्या संशयित प्रकरणांची चाचणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या ३५ प्रयोगशाळांपैकी नागपूर ‘एम्स’ एक आहे.