आता मोबाईलवरच मीटर रिडींगची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:37 PM2019-02-08T23:37:05+5:302019-02-08T23:38:14+5:30
महावितरणकडून वीज ग्राहकांना वीज बिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जात आहे. याशिवाय एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना यापूर्वीच उपलब्ध करून दिली असल्याने महावितरणने आता वीज बिलावरील मीटर रिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद केली आहे. यामुळे आता ग्राहकांना मीटरचा फोटो नसलेले वीज बिल मिळण्यास सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणकडून वीज ग्राहकांना वीज बिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जात आहे. याशिवाय एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना यापूर्वीच उपलब्ध करून दिली असल्याने महावितरणने आता वीज बिलावरील मीटर रिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद केली आहे. यामुळे आता ग्राहकांना मीटरचा फोटो नसलेले वीज बिल मिळण्यास सुरुवात झाली आहे.
वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडींगची अचूक माहिती मिळावी म्हणून २००८ साली देशात महावितरणने सर्वप्रथम वीज बिलावर मीटर रिडींगचा फोटो छापण्याची पध्दत सुरू केली होती. या पद्धतीचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. महावितरणच्या या प्रयोगाचे अनुकरण देशभरातील अनेक वीज वितरण कंपन्या, पाणी पुरवठा संस्था आणि इतरही अनेक संस्थांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. महावितरणकडून ग्राहक सेवा अधिकाधिक तत्पर, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यासाठी नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याने ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची इत्थंभूत माहिती एसएमएसद्वारे दिली जात आहे. त्यामुळे मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज बिल मिळण्यापूर्वीच मीटर रिडींग घेताच त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जात असल्याने ग्राहकांना आपले मीटर रिडींग पडताळणीसाठी सुविधा उपलब्ध आहे. सोबतच मीटर रिडींगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्य आहे.
गो ग्रीनचा ही उत्तम पर्याय
महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकांना अनेक सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार लाखो ग्राहक बसल्या जागेवरून कधीही वीजदेयकाचा भरणा ऑनलाईन करीत आहेत. ऑनलाईन असणाऱ्या ग्राहकांना ‘गो ग्रीन’चा पर्याय स्वीकारीत ई-बिलचा वापर करणे म्हणजेच झाडांचे आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षणास मदत करण्यासोबतच मासिक बिलात दहा रुपयांची बचतही आहे.