आता लायसन्स जप्त होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:57 AM2018-08-19T00:57:20+5:302018-08-19T00:58:20+5:30

ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे, परवाना, पीयुसी, इन्शुरन्स ‘डिजी लॉकर’ प्रणालीत साठवून ठेवली आहे, त्यांच्याकडून मोटार वाहन निरीक्षकांनी मूळ कागदपत्राची मागणी करू नये, अशा सूचना परिवहन आयुक्तांनी शनिवारी दिल्या. विशेष म्हणजे, दोषी वाहन चालकाचा परवाना जप्त करायचा असल्यास त्याची नोंद ई-चालनच्या माध्यमातून किंवा सारथी प्रणालीतून करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

Now the license will not be confiscated | आता लायसन्स जप्त होणार नाही

आता लायसन्स जप्त होणार नाही

Next
ठळक मुद्दे थेट सारथी प्रणालीत होणार नोंद : परिवहन आयुक्तांनी दिले आदेश : ‘डिजी लॉकर’मध्ये वाहनाची कागदपत्रे अधिकृत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे, परवाना, पीयुसी, इन्शुरन्स ‘डिजी लॉकर’ प्रणालीत साठवून ठेवली आहे, त्यांच्याकडून मोटार वाहन निरीक्षकांनी मूळ कागदपत्राची मागणी करू नये, अशा सूचना परिवहन आयुक्तांनी शनिवारी दिल्या. विशेष म्हणजे, दोषी वाहन चालकाचा परवाना जप्त करायचा असल्यास त्याची नोंद ई-चालनच्या माध्यमातून किंवा सारथी प्रणालीतून करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
केंद्र सरकारने नागरिकांसाठी ‘डिजी लॉकर’सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात वाहनाच्या संदर्भातील कागदपत्रांसोबतच पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे आणि आता वाहनाचे इन्शुरन्सही साठविता येणे शक्य झाले आहे. ‘डिजी लॉकर’ हे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाशी जोडले गेले आहे. तसेच या ‘अ‍ॅप’वरील कागदपत्रे ग्राह्य धरली जावीत, अशा सूचना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने दिल्या आहेत. सध्या डिजिलॉकर हे ‘अ‍ॅप’ ‘अँड्रॉईड’ व ‘आयओएस’वर उपलब्ध आहे. मात्र, ‘एम- परिवहन’ हे अ‍ॅप सध्या ‘अँड्रॉईडवर’ उपलब्ध असून येत्या १० दिवसात ते ‘आयओएसवर’ही उपलब्ध होणार आहे. वाहतूक पोलिसांना किंवा मोटार वाहन निरीक्षकांना या ‘अ‍ॅप’वरील कागदपत्रांची तपासणी करायची असल्यास तिथे ‘क्युआर कोड’ची सुविधा आहे. त्या कोडचा वापर करून वाहन चालकाचे नाव, पत्ता, मोबाईल, क्रमांक, जन्मतारीख, वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसीस क्रमांक आदी बाबीची सत्यता पडताळता येते. यामुळे ज्या वाहनधारकांनी आपली कागदपत्रे ‘डिजी लॉकर’मध्ये साठवली आहे त्यांना ती सोबत बाळगणे गरजेचे नाही. अशा वाहनचालकांनी आपल्या मोबाईलच्या या ‘अ‍ॅप’मधील डिजिटल कागदपत्रे दाखविल्यास ती ग्राह्य धरावी व त्यांच्या विरुद्ध केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून नये, अशा सूचना परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सर्व आरटीओ कार्यालयांना व वाहतूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परंतु अशा वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचा भंग झाल्यास आणि कारवाई म्हणून वाहन परवाना जप्त करायचा असल्यास त्याची नोंद ई-चालनच्या माध्यमातून किंवा सारथी प्रणालीमध्ये करावी, असे निर्देशही दिले आहेत. मात्र, मोटार वाहन निरीक्षक किंवा तत्सम अधिकाऱ्यांना या प्रणालीबाबत किती माहिती आहे आणि कारवाईसाठी कुठल्या प्रणालीचा वापर करावा याचे कितपत ज्ञान आहे, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: Now the license will not be confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.