दारू तस्करांचा मोर्चा आता दिव्यांगांच्या कोचकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:25 PM2019-03-30T22:25:13+5:302019-03-30T22:27:12+5:30
रेल्वे सुरक्षा दलाकडून दररोज विविध रेल्वेगाड्यात दारूची कारवाई करण्यात येत आहे. आरपीएफच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी दारू तस्करांनी शनिवारी आपला मोर्चा दिव्यांगांच्या कोचकडे वळविला. दक्षिण एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने तीन कारवाया करून ५,८८० रुपये किमतीची दारू जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाकडून दररोज विविध रेल्वेगाड्यात दारूची कारवाई करण्यात येत आहे. आरपीएफच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी दारू तस्करांनी शनिवारी आपला मोर्चा दिव्यांगांच्या कोचकडे वळविला. दक्षिण एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने तीन कारवाया करून ५,८८० रुपये किमतीची दारू जप्त केली.
रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक बी. एस. बघेल, एन. पी. वासनिक, जाहिद खान, विकास शर्मा हे सायंकाळी ६.४० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ३ वर गस्त घालत होते. त्यांना १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसच्या दिव्यांगांसाठी राखीव कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्या व्यक्तीजवळ एक काळ्या रंगाची बॅग होती. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यास आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक व्ही. डी. यादव यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याने आपले नाव श्रीनिवास सत्यनारायण मूर्ती (४९) रा. खम्मम आंध्र प्रदेश सांगितले. संशयाच्या आधारे त्याच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १८०० रुपये किमतीच्या ३ बॉटल होत्या. दुसऱ्या घटनेत त्याच कोचमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्याच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २२८० रुपये किमतीच्या ३ बॉटल आढळल्या. तिसऱ्या घटनेत त्याच कोचमध्ये एका बेवारस स्थितीत ठेवलेल्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये दारूच्या १८०० रुपये किमतीच्या ५२ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.