आता संत्रा मार्केटमध्येही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : बाजार बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:05 PM2020-04-15T23:05:53+5:302020-04-15T23:07:14+5:30
कळमन्यातील फळ बाजार आठवड्यातून तीन दिवसच सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आता संत्रा मार्केटमध्ये व्यापारी, अडतिया, शेतकरी आणि नागरिकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमन्यातील फळ बाजार आठवड्यातून तीन दिवसच सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आता संत्रा मार्केटमध्ये व्यापारी, अडतिया, शेतकरी आणि नागरिकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजाराप्रमाणेच संत्रा मार्केटही बंद करण्याची मागणी काही सजग नागरिकांनी लोकमतकडे लावून धरली आहे.
कोविड-१९ लॉकडाऊनमध्ये कळमन्यातील सर्व बाजारात होणारी गर्दी पाहता, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बाजाराचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार फळ बाजार मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू राहणार असून, आठवड्यात तीन दिवस बाजार सुरू राहणार असल्याने उर्वरित दिवस फळांची विक्री कुठे करायची, असा प्रश्न अडतिया आणि व्यापाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे एरवी गर्दी नसलेल्या कॉटन मार्केटलगतच्या संत्रा मार्केटमध्ये व्यापारी, अडतिया, उत्पादक शेतकरी आणि नागरिकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत आहे.
व्यापारी व अडतियांनी निवडला दुसरा पर्याय
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी कळमना फळ बाजार बंद होता. पण व्यापारी आणि अडतियांनी फळांच्या गाड्या संत्रा मार्केटमध्ये बोलविल्या. व्यापारी आणि अडतियांनी या ठिकाणी संत्र्याचा लिलावही करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली. कळमन्याच्या तुलनेत संत्रा मार्केटमध्ये जागा फारच कमी आहे. एवढ्याशा जागेत बुधवारी सकाळी ७ ते १० या वेळेत पाच हजारापेक्षा जास्त लोकांची गर्दी होती, अशी माहिती आहे.
संत्र्याच्या हंगामाचे काहीच दिवस उरले आहेत. याशिवाय अननस, द्राक्षांचा मोसम सुरू आहे. कळमन्यात नागपूर जिल्ह्यातून संत्री, महाराष्ट्रातून द्राक्षे आणि अन्य राज्यातून विविध फळांची आवक सुरू आहे. मार्च ते मे महिन्यात फळांची दररोज सर्वाधिक आवक असते. त्यामुळे एक दिवसाआड फळांची विक्री करणे उत्पादक आणि व्यापाºयांना परवडणारे नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांचे लक्ष नसलेल्या संत्रा मार्केटचा पर्याय व्यापारी आणि अडतियांनी निवडल्याचे सूत्रांनी सांगितले.