वेडेवाकड्या दातावर आता आणखी अचूक उपचार; शासकीय दंत रुग्णालयात ‘व्हर्च्युअल सिम्युलेटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 07:30 AM2022-02-12T07:30:00+5:302022-02-12T07:30:02+5:30

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने ‘व्हर्च्युअल सिम्युलेटर’ यंत्रासाठी पुढाकार घेतला असून या यंत्रामुळे कौशल्यप्राप्त डॉक्टर घडून दंत रुग्णांवर आणखी अचूक उपचार होतील.

Now more accurate treatment on crazy teeth; Virtual Simulator at Government Dental Hospital | वेडेवाकड्या दातावर आता आणखी अचूक उपचार; शासकीय दंत रुग्णालयात ‘व्हर्च्युअल सिम्युलेटर’

वेडेवाकड्या दातावर आता आणखी अचूक उपचार; शासकीय दंत रुग्णालयात ‘व्हर्च्युअल सिम्युलेटर’

Next
ठळक मुद्देकौशल्यप्राप्त डॉक्टर घडविण्यासाठी पुढाकार

सुमेध वाघमारे

नागपूर : वेडेवाकडे दाताचे व्यंग दूर करताना, कृत्रिम दात लावताना, एवढेच नव्हे, तर लहान मुलांवरील दातांवर उपचार करताना दंत तज्ज्ञांसमोर आव्हान असते. एक छोटीशी चूक जीवघेणी ठरू शकते. यासाठी ‘प्री-क्लिनिकल’ प्रशिक्षण दिले जाते; परंतु त्याला मर्यादा असतात. याची दखल घेत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने ‘व्हर्च्युअल सिम्युलेटर’ यंत्रासाठी पुढाकार घेतला. या यंत्रामुळे कौशल्यप्राप्त डॉक्टर घडून दंत रुग्णांवर आणखी अचूक उपचार होतील.

राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयात आता सिम्युलेटर यंत्र लागले आहेत. परमनंट लायसन्ससाठी येणाऱ्या उमेदवारांना किंवा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास होणाऱ्यांना या सिम्युलेटरवर प्रशिक्षण दिले जात आहे. आता त्याच धर्तीवर शासकीय दंत महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विविध दंत रुग्णांवरील उपचारासाठी ‘व्हर्च्युअल सिम्युलेटर’वर प्रशिक्षण दिले जाणार आहे. या यंत्रासाठी सरकारने ८० लाखांच्या निधीला शुक्रवारी प्रशासकीय मंजुरी दिली. यामुळे लवकरच हे यंत्र महाविद्यालयात स्थापन होणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांसोबतच रुग्णांनाही होणार आहे.

-प्रशिक्षणाची गुणवत्ताही तपासणे शक्य

डेन्टल कॉलेजमधून दरवर्षी पदवीचे ६३, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे २०, असे ८३ डॉक्टर प्रशिक्षित होऊन बाहेर पडतात. या डॉक्टरना चिकित्सालयीन पूर्व शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. पूर्वी विद्यार्थ्यांना मानवी सांगाड्यावर कृत्रिम दातांवर प्रशिक्षण दिले जायचे, आता ‘थ्रीडी इमेजिंग’ पद्धतीने प्रशिक्षण दिले जात असताना त्याच्या पुढचे पाऊल म्हणजे ‘व्हर्च्युअल सिम्युलेटर’ असणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे दंत उपचार किती योग्य प्रकारे झाले, त्याची गुणवत्ताही तपासता येणार आहे.

-या चार विभागांसाठी असणार ‘सिम्युलेटर’

डेन्टल कॉलेजमधील बाल दंतशास्त्र विभाग, कृत्रिम दंतशास्त्र विभाग, दंत शल्यशास्त्र विभाग व दंत व्यंगोपचार विभागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे सिम्युलेटर यंत्र उपलब्ध असणार आहे.

- शासकीय रुग्णालयातील हे पहिले उपकरण

‘व्हर्च्युअल सिम्युलेटर’वर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे राज्यातील नागपूर शासकीय दंत महाविद्यालय पहिले असणार आहे. या यंत्राच्या मदतीमुळे कौशल्यप्राप्त डॉक्टर घडतील. सोबतच रुग्णांवर अचूक उपचार होतील.

-डॉ. अभय दातारकर

अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

Web Title: Now more accurate treatment on crazy teeth; Virtual Simulator at Government Dental Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य