लैंगिक गुन्हेगारीसंदर्भात नागपूर पोलीस करणार प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 07:00 AM2019-08-22T07:00:00+5:302019-08-22T07:00:06+5:30
बदलत्या लैंगिक गुन्हेगारीसंदर्भात विद्यार्थिनींमध्ये जागृती घडविण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागृत मी आणि समाज’ या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन आणि सज्ञान विद्यार्थिनींना लैंगिक गुन्हेगारीची जाणीव करून देण्यासाठी आणि जागृततेसाठी शहर पोलीस २६ ऑगस्टपासून जागृती अभियान राबवीत आहेत. २६ ते ३० ऑगस्ट या काळात शहर पोलिसांच्या पाचही झोनमध्ये हा उपक्रम शहर पोलीस विभागातील तीन महिला उपायुक्तांच्या नेतृत्वात राबविला जाणार आहे. विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मला देवी, झोन-२ च्या विनीता साहू तसेच आर्थिक शाखेच्या श्वेता खेलकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
निर्मला देवी म्हणाल्या, लैंगिक गुन्हेगारीचे रूप बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना रोज संकटाचा सामना करावा लागतो. मुली घरातही लैंगिकतेच्या शिकार ठरतात. मात्र त्यांना कळत नसल्याने आपल्यासोबत लैंगिक गुन्हा घडत असल्याची जाणीव त्यांना होत नाही. अशा घटनांची कुठे आणि कशी तक्रार करावी, हे सुद्धा त्यांना कळत नाही. विद्यार्थिनींच्या जागृतीसाठी पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा उपक्रम राबविले आहेत. बदलत्या लैंगिक गुन्हेगारीसंदर्भात विद्यार्थिनींमध्ये जागृती घडविण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागृत मी आणि समाज’ या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. पोलीस आपल्या मदतीसाठी असल्याची भावना आणि विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणे, हा उद्देश आहे. यात दोन एनजीओ, शांतता समितीच्या महिला सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना सहभागी केले जाणार आहे. दोन ते अडीच तासांच्या कार्यक्रमातून विद्यार्थिनींना यासंदर्भात माहिती दिली जाईल.
शहरात ९३८ शाळा आणि महाविद्यालये आहेत. या सर्वांना उपक्रमात सहभागी केले जाणार आहे. फ्रेंड्स गारमेंटमधील चेंजिंग रूम प्रकरण आणि अल्पवयीनांसोबत छेडखानीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हा उपक्रम नसून महिला आणि विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढावा, यासाठी हे पाऊल असल्याचे डीसीपी विनीता साहू यांनी सांगितले. यापूर्वीदेखील असे उपक्रम राबविले आहेत. यावेळी व्यापकता वाढविली आहे. आर्थिक शाखेच्या डीसीपी श्वेता खेलकर म्हणाल्या, आठवी व त्यावरील इयत्तेमधील विद्यार्थिनींसाठी हे अभियान असेल. यात विद्यार्थिनींच्या समस्या आणि तक्रारींचीही दखल घेतली जाईल.
पाच ठिकाणी होणार आयोजन
२६ऑगस्टला झोन पाचमधील जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूल, २७ ऑगस्टला झोन तीनमधील वर्धमान नगरातील व्हीएमव्ही कॉलेज, २८ ऑगस्टला झोन एकमधील हिंगणा येथील वायसीसी कॉलेज, २९ ऑगस्टलाझोन दोनमधील काँग्रेसनगरातील शिवाजी सायन्स कॉलेज आणि ३० ऑगस्टला झोन चारमधील नंदनवनच्या केडीके कॉलेजमध्ये आयोजन केले जाईल. या झोनअंतर्गत येणाऱ्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी, महिलांनीदेखील यात सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त निर्मला देवी यांनी केले आहे.