आता नागपूर रेल्वेस्थानक होणार ‘वर्ल्ड क्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:09 AM2018-02-27T10:09:21+5:302018-02-27T10:13:27+5:30
नागपूर रेल्वेस्थानकाला आंतरराष्ट्रीयस्तराचे बनविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तयारी केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सृजन या उपक्रमांतर्गत नागपूर रेल्वेस्थानकाची निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाला आंतरराष्ट्रीयस्तराचे बनविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तयारी केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सृजन या उपक्रमांतर्गत नागपूर रेल्वेस्थानकाची निवड करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वेस्थानकाचा विकास करण्यासाठी भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) आंतरराष्ट्रीय दर्जानुसार स्टेशनच्या विकासासाठी डिझाईनची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला असून, दुसरा टप्पा ३१ मार्च २०१८ रोजी पूर्ण होणार आहे.
तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी वर्ल्ड क्लास स्टेशनच्या यादीत नागपूरचा समावेश केला होता. त्यानुसार रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी विकास कामे करण्यात येणार होती. त्यासाठी काही वर्षांपूर्वी बेल्जियमचे रेल्वे प्रतिनिधी नागपुरात आले होते. परंतु त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. आता पुन्हा नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी ‘आयआरएसडीसी’तर्फे पाऊल उचलण्यात आले आहे. यात नागपूर रेल्वेस्थानकाचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करण्यासाठी भारत आणि इतर देशातील वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांची डिझाईन स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसरा टप्पा ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिझाईन ठरल्यानंतर ‘आयआरएसडीसी’ त्या डिझाईननुसार नागपूर रेल्वेस्थानकाचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करणार आहे. यात नागपूर रेल्वेस्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होऊन रेल्वेस्थानकावर विविध प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होतील.
‘आयआरएसडीसी’ करणार विकास
‘नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्याचे काम रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन विकास महामंडळाला दिले आहे. वर्ल्ड क्लासच्या दृष्टिकोनातून महामंडळाच्या माध्यमातून विकास कामे, डिझाईन, नकाशा तयार करण्यात येईल. यात रेल्वेस्थानकाच्या विकासाचे आंतरराष्ट्रीय डिझाईन मंजूर करणे आणि त्यानुसार रेल्वेस्थानकाचा विकास करण्याचे संपूर्ण काम आयआरएसडीसी करणार आहे. विकासात कोणत्या बाबींचा समावेश राहील, याची माहिती नागपूर विभागात उपलब्ध नाही.’
-कुश किशोर मिश्र, ‘सिनियर डीसीएम’मध्य रेल्वे, नागपूर विभाग