आता नागपुरातही होणार हृदय प्रत्यारोपण; न्यू इरा हॉस्पिटलला मिळाली मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 06:41 PM2018-04-26T18:41:16+5:302018-04-26T18:41:30+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी दिली आहे. तसे पत्र गुरुवारी या हॉस्पिटलला प्राप्त झाले. विशेष म्हणजे, राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपूर हे चौथे केंद्र राहणार असून मध्य भारतातील पहिले असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीच्या अवयवदान चळवळीला चांगले दिवस येऊ पाहत आहे. आता नागपुरात केवळ मूत्रपिंड प्रत्यारोपण होत नाहीतर यकृत प्रत्यारोपणालाही सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत दोन यृकत प्रत्यारोपण झाले आहे, असे असताना सार्वजनिक आरोग्य विभागाने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी दिली आहे. तसे पत्र गुरुवारी या हॉस्पिटलला प्राप्त झाले. विशेष म्हणजे, राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपूर हे चौथे केंद्र राहणार असून मध्य भारतातील पहिले असणार आहे. याच हॉस्पिटलमध्ये नागपुरातील पहिले यकृत प्रत्यारोपण झाले.
हृदय प्रत्यारोपणाच्या मंजुरीला घेऊन गुरुवारी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यू इरा हॉस्पिटलचे संचालक व कार्डियक व हृदयप्रत्यारोपण सर्जन डॉ. आनंद संचेती, संचालक व न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, संचालक आणि इन्टरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. निधिश मिश्रा उपस्थित होते.
दरवर्षी ५० हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज
डॉ. आनंद संचेती म्हणाले, देशात दरवर्षी ५० हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज पडते, परंतु त्या तुलनेत ३५० ते ४०० हृदय प्रत्यारोपण होतात. नागपुरातील अनेक रुग्ण पुणे, मुंबईकडे जाऊन हृदय प्रत्यारोपण करतात. गेल्या काही महिन्यांपासून इरा हॉस्पिटलने हृदय प्रत्यारोपणासाठी आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध करून सार्वजनिक आरोग्य विभागाला प्रत्यारोपणाचा प्रस्ताव पाठविला. दरम्यानच्या काळात विभागाच्या चमूने येऊन पाहणीही केली होती. आता याला गुरुवारी मंजुरी मिळाली. यामुळे लवकरच यकृत प्रत्यारोपणासोबतच हृदय प्रत्यारोपणही होईल.
हृदयावरील उपचार पद्धती
डॉ. संचेती म्हणाले, हृदयाच्या कार्यपद्धतीत बिघाड आल्यास काही उपचारपद्धती आहेत. यात ‘कोरोनरी आर्टरी बायपास’, ‘अॅन्जिओप्लास्टी’, ‘व्हाल्व रिप्लेसमेन्ट’, ‘आॅटोमेटेड इम्प्लान्टेबल कार्डिओव्हरटर-डीफिब्रिलेटर’ (एआयसीडी), ‘बिव्हेंट्रीक्युलर पेसमेकर’ (बीआयव्ही किंवा सीआरटी), ‘लेफ्ट व्हेन्टीट्रीक्युलर असिस्ट डिव्हाईस’ आणि हृदय प्रत्यारोपणाचा समावेश आहे. उपचार करून दुरुस्त करण्यापलीकडे रुग्ण जातो अशा वेळेस हृदय प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) हा एक पर्याय असू शकतो.
हृदय प्रत्यारोपणाचा यशाचा दर ९० टक्के
हृदय प्रत्यारोपणाला मंजुरी मिळत नाही तोच या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत तीन रुग्णांच्या नावाचाही समावेश झाल्याचे डॉ. संचेती म्हणाले. त्यांनी सांगितले, हृदय निकामी होण्याला अनेक घटक कारणीभूत असतात. परंतु अलीकडे या घटना वाढत असल्याने हृदय प्रत्यारोपणाचे महत्त्व वाढले आहे. हृदय प्रत्यारोपणाचा यशाचा दर ९० ते ८० टक्के असतो.
हृदय प्रत्यारोपणासाठी असतो केवळ चार तासांचा वेळ
ब्रेनडेड व्यक्तीच्या शरीरातून हृदय काढल्यानंतर त्याचे प्रत्यारोपण करण्यासाठी केवळ चार तासांचा वेळ असतो. यामुळे अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कमी वेळात करणे हे आव्हानात्मक असते. प्रत्यारोपणासाठी हृदय उपलब्ध झाल्यानंतर गरजू पेशंटला जीवदान देणे हे आमचे कर्तव्य असते, असेही डॉ. संचेती म्हणाले.
आतापर्यंत सात हृदय नागपूरबाहेर
विभागीय प्रत्यारोपण समितीने (झेडटीसीसी) उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार २०१३ ते आतापर्यंत ब्रेनडेड व्यक्तीकडून मिळालेले सात हृदय नागपूर बाहेर पाठविण्यात आले. आता नागपुरात हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी मिळाल्याने रुग्णांना नागपूरबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. भारतात सर्वाधिक हृदय प्रत्यारोपण चेन्नई येथे केले जाते, असेही डॉ. संचेती म्हणाले.