आता पाकिस्तान व चीनही भारताला हरवू शकत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:38+5:302021-07-26T04:07:38+5:30
निशांत वानखेडे नागपूर : आधुनिक शस्त्रास्त्र, उपग्रह शक्ती, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या तांत्रिक बाबतीत चीन हा भारतापेक्षा निश्चित वरचढ आहे. ...
निशांत वानखेडे
नागपूर : आधुनिक शस्त्रास्त्र, उपग्रह शक्ती, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या तांत्रिक बाबतीत चीन हा भारतापेक्षा निश्चित वरचढ आहे. मात्र आपली शक्तीही या काळात चांगलीच वाढली आहे. त्यामुळे भारतावर हल्ला करायला चीनला दहावेळा विचार करावा लागेल. एवढेच नाही तर पाकिस्तान व चीनने एकाचवेळी आपल्यावर हल्ला केला तरी त्यांचा हल्ला थाेपविण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे, असा विश्वास निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.
कारगिल विजय दिनाच्या २२ व्या स्मृतीनिमित्त त्यांनी लाेकमतशी संवाद साधला.
प्रश्न : कारगिल युद्धाच्या २० वर्षांनंतर परिस्थितीत काय अंतर आले आहे?
कर्नल : १९९८-९९ मध्ये भारत व पाकिस्तान हे दाेन्ही देश अण्वस्त्रधारी बनले हाेते. मात्र यादरम्यान दाेन्ही देशांमध्ये करार करण्यात आला व दाेन्हीकडच्या सीमेवरून सैन्य परत घेण्याचे सांगण्यात आले. हिवाळ्यात भारतीय सैनिकांनी सीमेवरून हटायला सुरुवात केली. ही पहिली चूक ठरली कारण पाकिस्तानने करार माेडला. त्यांनी सैनिक परत पाठविले नाहीत. दुसरी चूक म्हणजे राॅ किंवा भारतीय गुप्तचर संस्थांनी हवाई सर्व्हिलेन्स ठेवण्यात दुर्लक्ष केले आणि तिसरी गाेष्ट म्हणजे लडाख व कारगिल भागात अत्यल्प प्रमाणात सेना हाेती. या गाेष्टींचा फायदा घेत भारतीय सैनिक परतल्यानंतर तोच भाग पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतला व त्यामुळे कारगिल युद्ध घडले. आपण हे युद्ध जिंकले, हे सैन्याचे शाैर्यच आहे. त्यावेळी कारगिल, लडाख सेक्टरमध्ये माती, दगडांचे बंकर हाेते. लडाखमध्ये २० हजार सैनिकांचे एक डिव्हिजन तैनात हाेते व त्यातील ६ हजार सैनिकांची एक तुकडी कारगिलमध्ये व बाकी पूर्व लडाखमध्ये हाेते. आज परिस्थिती बदलली आहे. आता ७० हजार सैनिकांना पूर्वी लडाखसह कारगिलपर्यंत तैनात केले आहे. ते सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सज्ज आहेत. आता पाकड्यांनी गडबड केली तर त्यांनाच जड जाईल.
प्रश्न : चीनच्या हालचाली किती धाेकादायक?
कर्नल : चीन तांत्रिकदृष्ट्या अधिक वरचढ असला तरी भारतावर डाेळा टाकण्याची त्याची हिंमत हाेणार नाही. चीनने तिबेटमध्ये हालचाली सुरू केल्या आहेत, त्यात आपण हस्तक्षेप करू शकत नाही. तसे भारतानेही आपल्या भूभागात सैन्य सज्ज केले आहे. ब्रह्मोस मिसाईलपासून राफेल व सुखाेईसारखी हवाई टीम तैनात करण्यात आली आहे. उपग्रहाद्वारे चीनच्या बाह्य हालचालींची माहिती आपल्याला मिळते पण आंतरिक गाेष्टींची गुप्त माहिती घेणे आवश्यक आहे. चीनकडे ते आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आहे पण भारताने त्यांचे मनसुबे पूर्ण हाेऊ दिले नाहीत. त्यामुळे चीन किंवा पाकिस्तानने एकाच वेळी जरी हल्ला केला तरी भारताला नमविणे आता कठीण आहे.
प्रश्न : चीन-पाकिस्तान आर्थिक काॅरिडाेरमुळे काय हाेईल?
कर्नल : चीनने आर्थिक फायद्यासाठी हा काॅरिडाेर तयार करण्याचे काम चालविले आहे. तिबेटमधून काराकाेरम पास हाेत पाकव्याप्त काश्मीरमधून ५० किमीचा रस्ता तयार केला जाणार आहे. या काॅरिडाेरचा फायदा किंवा नुकसान भारताला नाही. मात्र चीन या भागातून आक्रमण करण्याचा धाेका आहे. भारत सरकार या दृष्टीने पावले उचलत आहे, हे महत्त्वाचे आहे.