विधान परिषदेत आता नऊ नागपूरकर सदस्य : प्रवीण दटके यांचा शपथविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:56 PM2020-05-18T21:56:31+5:302020-05-18T22:00:04+5:30
विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपचे प्रवीण दटके यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने विधान परिषदेत नागपूरच्या एकूण सदस्यांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपचे प्रवीण दटके यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने विधान परिषदेत नागपूरच्या एकूण सदस्यांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे. भाजयुमो कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर व आता आमदार असा दटके यांचा प्रवास राहिला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरीस विधान परिषदेत नागपूर शहरातील सदस्यांची संख्या आठइतकी होती. नागो गाणार, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, अनिल सोले, गिरीश व्यास, परिणय फुके, रामदास आंबटकर, दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूरकर विधान परिषदेत सदस्य आहेत. आता दटके यांचादेखील यात समावेश झाला आहे. फुके, आंबटकर, चतुर्वेदी हे नागपुरातून विजयी झाले नसले तरी त्यांचे निवासस्थान शहरातच आहे. सद्यस्थितीत विधान परिषदेत ७४ सदस्य असून त्यातील नऊ सदस्य उपराजधानीतील झाले आहेत.
भाजपचे नेते प्रभाकरराव दटके यांचे पुत्र असलेल्या प्रवीण यांनी लहानपणापासूनच राजकीय वातावरण जवळून पाहिले. २००० साली दटके यांनी भाजयुमो कार्यकर्ता म्हणून सक्रियपणे काम करायला सुरुवात केली. २००२ साली झालेल्या मनपा निवडणुकांत महाल येथील वॉर्डातून त्यांनी निवडणूक जिंकली. पुढील दोन निवडणुकांतदेखील विजय मिळवून त्यांनी ‘हॅट्ट्रिक’ लगावली. महापालिकेत सत्तापक्ष नेता, जलप्रदाय समिती अध्यक्ष, महापालिकेचे महापौर अशी अनेक पदे दटके यांनी भूषविली. २०१४ साली वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांच्याकडे महापौरपदाची जबाबदारी आली. दरम्यानच्या काळात पक्षातीलदेखील संघटनकार्यात त्यांच्याकडे पदभार येत गेले. २०१० साली ते भाजयुमोचे नागपूर शहर अध्यक्ष झाले. प्रदेश पातळीवर सरचिटणीस म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले. २०१७ साली भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणूकांनंतर त्यांच्याकडे भाजपचे हंगामी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी आली.