आता मनपा करणार सर्व झोपडपट्ट्यांचा विकास
By admin | Published: May 9, 2015 02:20 AM2015-05-09T02:20:02+5:302015-05-09T02:20:02+5:30
महापालिकेच्या हद्दीतील सर्व ४२४ झोपडपट्ट्यांचा विकास आता महापालिका स्वत: करेल.
नागपूर : महापालिकेच्या हद्दीतील सर्व ४२४ झोपडपट्ट्यांचा विकास आता महापालिका स्वत: करेल. फोटो ओळखपत्र देण्यापासून ते मालकी हक्काचे पट्टे देण्यापर्यंत व सोबतच येथील विकास कामे करण्यासाठी आता दुसऱ्या प्राधीकरणाची किंवा विभागाची परवानगी घेण्याची गरज पडणार नाही. राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागातर्फे या संबंधीची अधीसूचना जारी करण्यात आली असून महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) यांना सक्षम प्राधीकारी म्हणून नियुक्त केले आहे.
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये पथदीवे, पाणीपुरवठा, रस्ते आदी कामे महापालिका करते. मात्र महापालिकेकडे अधिकृतरित्या शहरातील १४ झोपडपट्ट्यांचा अधिकार नव्हता. आता या अधीसूचनेमुळे शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग अप्रत्यक्षपणे मोकळा झाला आहे. मनपाच्या स्लम विभागाची जबाबदारी देखील वाढली आहे. झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखविली होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नासुप्रमध्ये विकास कामांबाबत बैठक झाली होती. त्यातही महापालिकेला सर्व झोपडपट्ट्यांचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती. २३ एप्रिल २०१५ रोजी जारी करण्यात आलेल्या अधीसूचनेत स्पष्ट उल्लेख आहे की, राज्यपालांच्या आदेशानुसार संबंधित निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधार, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ मध्ये सुधारणा करून नागपूर महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) यांना सक्षम प्राधिकारी नेमण्यात आले आहे. यामुळे नागपूर महापालिकेला आता महापालिकेच्या जमिनीवर असलेल्या, महापालिकेच्या हद्दीत नासुप्रच्या जमिनीवर असलेल्या, शासकीय जमिनीवरील, खासगी जमिनीवरील सर्व झोपडपट्ट्यांचे अधिकार मिळाले आहेत.
अपील प्राधिकारी म्हणून नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जबाबदारी वाढली : नेरळ
महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) सतीश नेरळ यांनी अधिसूचना प्राप्त झाली असल्याचे सांगितले. झोपडपट्टीवासीयांना फोटो ओळखपत्र देण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी आवश्यक असलेले अर्ज देखील संबंधित प्राधीकरणाकडून प्राप्त झाले आहेत.
नझूलच्या जमिनीवर
सर्वाधिक झोपडपट्टी
शहराच्या हद्दीत असलेल्या झोपडपट्ट्यांची गणना करण्यात आली होती. त्या वेळी ४२४ झोपडपट्ट्या निश्चित करण्यात आल्या होत्या. २००२ पूर्वीच्या झोपड्यांना अधिकृत मानले जाईल. नझूलच्या जमिनीवर सर्वाधिक २३७ झोपडपट्ट्या आहेत. याशिवाय नासुप्रकडे ४० झोपडपट्ट्या आहेत.