आता पदाधिकारी नाही, अधिकारी टार्गेट !
By admin | Published: October 24, 2015 03:13 AM2015-10-24T03:13:27+5:302015-10-24T03:13:27+5:30
भ्रष्टाचार, घोेटाळ्यांचा आरोप करीत विरोधी पक्षातील काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या गेल्या काही सभांना लक्ष्य केले.
नागपूर : भ्रष्टाचार, घोेटाळ्यांचा आरोप करीत विरोधी पक्षातील काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या गेल्या काही सभांना लक्ष्य केले. पदाधिकाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही सत्ताधारी चौकशी करायला, गुन्हे दाखल करायला तयार दिसत नसल्यामुळे आता काँग्रेसने आपली रणनीती बदलली आहे. आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नव्हे तर अधिकाऱ्यांना टार्गेट करणार असल्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी फेब्रुवारी २०१३ पासून ते सप्टेंबर २०१५ पर्यंत महापालिकेच्या सभेत विचारलेल्या ३२ प्रश्नांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांना उत्तर मागितले आहे.
विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी आयुक्त हर्डीकर यांना प्रश्न व तारखेच्या क्रमवारीसह निवेदन देऊन उत्तर मागितले आहे. ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, सत्तारुढ नागपूर विकास आघाडीच्या सात नगरसेवकांच्या विरोधात पाणीपुरवठा कंपनी ओसीडब्ल्यूने गुन्हे दाखल केले. मात्र, त्यानंतरही संबंधित कंपनीकडून स्पष्टीकरण मागण्यात आले नाही. या कंपनीवर कारवाई करणे तर दूरच पण आयुक्तही दखल घेत नाही. त्यामुळेच सभागृहात विचारलेल्या प्रश्नांची आयुक्तांना उत्तरे मागण्यात आली आहेत. यावर आयुक्तांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही तर त्यांच्याशी थेट चर्चा केली जाईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने सभागृहात विविध विषय मांडले. चर्चा केली. काही प्रकरणांमध्ये निर्णयही देण्यात आला. मात्र, त्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही.
नागार्जुन, स्टार बस, ओसीडब्ल्यू, जेएनएनयूआरएम अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात झालेला घोटाळा, दहनघाटावर झालेला लाकूड घोटाळा आदी प्रकरणे सभागृहात मांडूनही त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)