आता एसटीतही मिळणार प्रवाशांना कॅशलेस व्यवहाराची सुविधा

By नरेश डोंगरे | Published: August 8, 2023 08:55 PM2023-08-08T20:55:51+5:302023-08-08T20:55:58+5:30

अनेक डेपोत आल्या अँड्रॉइड मशीन : वाहकांची डोकेदुखी कमी होणार

Now passengers will get facility of cashless transaction in ST | आता एसटीतही मिळणार प्रवाशांना कॅशलेस व्यवहाराची सुविधा

आता एसटीतही मिळणार प्रवाशांना कॅशलेस व्यवहाराची सुविधा

googlenewsNext

नागपूर : अमृतमहोत्सवी वर्षात वाटचाल करूनही प्रवाशांसोबत पारंपरिक (जुनाच) आर्थिक व्यवहार करणाऱ्या एसटीने अखेर कॅशलेस व्यवहाराच्या उंबरठ्यावर पाय ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर, महामंडळाकडून राज्यभरात कार्यरत असलेल्या एसटीतील वाहकांच्या हातात आता अँड्रॉइड (ईटीआय) मशिन ठेवण्यात येत आहे. या मशिनच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट देण्यासोबतच त्यांना आर्थिक व्यवहाराचा पाहिजे तो पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

एसटी बस राज्याची लोकवाहिनी, लाइफलाइन म्हणूनही ओळखली जाते. अमृतमहोत्सवी वर्षात प्रवास करणाऱ्या लालपरीने अनेकदा रंगरूप बदलले. अगदी विठाई, शिवाई म्हणूनही तिचे देखणे रूप बघायला मिळते. ती आता फुल्ली ईलेक्ट्रिकही झाली. मात्र, वेळोवेळी रूपडं बदलवूनही प्रवाशांसोबत तिचा व्यवहार ७५ वर्षांपूर्वी होता, तसाच राहिला. ना ऑनलाइन, ना कार्ड, ना फोन पे, ना गुगल पे. रोकडा द्या अन् प्रवास करा, असा रोखठोक बाणा एसटीचा आतापर्यंत होता.

एकीकडे खासगी बसवाले, टॅक्सीच काय, साधा ऑटोवाला क्यूआर कोड, फोन पे, गुगल पेचे ऑप्शन देतो, तुम्हीच का नगदी मागता, असा सवाल वाहकांना केला जात होता. त्यात तिकिटाचे फुटकळ दर (इतके रुपये, तितके पैसे) आणि त्यासाठी होणारी कटकट प्रवाशांपेक्षा एसटीच्या वाहकांसाठी डोकेदुखीचा विषय होता. ते इतक्या वर्षांनी का होईना आता एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी लक्षात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील बहुतांश विभागांच्या वाहकांकडे अँड्रॉइड मशिन देणे सुरू झाले आहे. या मशिनच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट देणे, त्याचा हिशेब ऑटोमॅटिक मशिनमध्येच उपलब्ध राहणे, या बाबी वाहकांसाठी फायद्याच्या ठरणार आहे. तर प्रवाशांना कॅशलेस व्यवहार करण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.

नागपूर, अमरावतीला मिळाल्या विदर्भातील इतर जिल्ह्यांनाही लवकरच मिळणार

विदर्भात काही ठिकाणी ईटीआय मशिन मिळाल्या असून, काही जिल्ह्यांत त्या पोहोचणार आहेत. त्यासंदर्भातील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
नागपूर विभागात १०८३ मशिन मिळाल्या. अमरावती विभागात १०५८ मशिन मिळाल्या तर, भंडारा ६००, चंद्रपूर ४०५, गडचिरोली ४००, बुलडाणा ९६५ आणि यवतमाळ जिल्ह्यातून ९६४ मशिनची मागणी नोंदविण्यात आली आहे.

नागपुरातील सर्व डेपोंतून या मशिनचा वापर लवकरच सुरू केला जाणार आहे. या मशिन वाहकांसोबतच प्रवाशांसाठीही सोयीच्या ठरणार आहेत. सुट्या पैशांचा वाद या मशिनच्या माध्यमातून आता निकाली निघणार आहे. - श्रीकांत गभणे, उपमहाव्यवस्थापक, एसटी, नागपूर.

Web Title: Now passengers will get facility of cashless transaction in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर