आता प्रवाशांना ‘कुल्हड’मध्ये मिळणार चहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:26 AM2020-12-11T04:26:26+5:302020-12-11T04:26:26+5:30
नागपूर : मातीपासून तयार झालेल्या कपात (कुल्हड) चहा पिण्याची मजा वेगळीच आहे. यामुळे चहाचा स्वाद वाढतो, शिवाय ‘कुल्हड’ बनविणाऱ्या ...
नागपूर : मातीपासून तयार झालेल्या कपात (कुल्हड) चहा पिण्याची मजा वेगळीच आहे. यामुळे चहाचा स्वाद वाढतो, शिवाय ‘कुल्हड’ बनविणाऱ्या कुंभाराला रोजगारही मिळणार आहे.
ही बाब ध्यानात ठेवून तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रेल्वे स्थानकावर ‘कुल्हड’मध्ये चहा देण्याची सुरुवात केली होती, हे विशेष. कालांतराने ही पद्धत बंद झाली आणि त्यामुळे प्रवाशांना प्लास्टिक वा पेपरच्या कपमध्ये चहा प्यावा लागला. परंतु आता पुन्हा भारतीय रेल्वेत ‘कुल्हड’मध्ये चहा देणे सुरू झाले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकाराने मध्य रेल्वेत नागपूर, मुंबई, भुसावळ, सोलापूर आणि पुणे मंडळाच्या स्थानकावर ‘कुल्हड’ अर्थात मातीच्या कपात चहा विकण्याची सुरुवात झाली आहे. यात नागपूर रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे.
स्थानकावरील स्टॉलवर ‘कुल्हड’मध्ये चहाची विक्री होत आहे. या उपक्रमाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
‘कुल्हड’मध्ये चहा पिणारे प्रवासी सुनील जॉन म्हणाले, ‘कुल्हड’मध्ये चहा पिण्याची मजा वेगळीच आहे. त्यामुळे चहाचा स्वाद निश्चितच वाढतो. अन्य एक प्रवासी ईशाक म्हणाले, ‘कुल्हड’मध्ये चहा पिण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. ‘कुल्हड’च्या उपयोगाने पर्यावरणाची सुरक्षा होते आणि मातीपासून तयार होणाऱ्या भांड्याच्या उद्योगाला प्रोत्साहन मिळते. या माध्यमातून ‘कुल्हड’चे उत्पादन करणाऱ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे.