आता १० व १२ वीच्या परिक्षेत प्रश्नांचा ‘पॅटर्न’ बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:32 AM2018-08-27T10:32:52+5:302018-08-27T10:35:15+5:30
राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. वर्ग १० वी व १२ व्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नांच्या पॅटर्न बदल होणार असून येत्या मार्च २०१९ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार प्रश्नांच्या नवीन पद्धतीबाबत शिक्षकांना माहिती देण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत राज्यभरातील शिक्षकांना बोलाविण्यात येणार आहे, ज्यामुळे बदललेल्या पद्धतीची माहिती ते विद्यार्थ्यांना देऊ शकतील. या कार्यशाळेच्या आयोजनाची तयारी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रश्नांची ही नवी पद्धत वर्तमान पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल. विशेषत्वाने भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न वेगळे असतील. मिळालेल्या माहितीनुसार नवीन पद्धतीत विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्यावर (कम्युनिकेशन स्कील) अधिक भर राहणार आहे. त्यांच्या अभ्यास व लेखनकौशल्याचे आकलन केले जाणार आहे. मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, हा बदल होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र हे बदल कशा प्रकारचे असतील, याबाबत स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर पुण्यात बैठक होणार असून नंतरच स्थिती स्पष्ट होणार असल्याचे ते म्हणाले.
सीबीएसईचा स्तर गाठण्यावर भर
नव्या बदलाच्या माध्यमातून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या स्तराचा करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेईई व नीट आदींसारख्या परीक्षांची वेगळी तयारी करावी लागणार नाही. गेल्या काही वर्षात राज्य मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली असून सीबीएसईकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न केले जात असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.