नागपूर विद्यापीठाच्या प्रत्येक पदव्युत्तर विभागात आता ‘प्लेसमेन्ट सेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 09:37 PM2018-02-15T21:37:30+5:302018-02-15T21:37:42+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात ‘प्लेसमेन्ट सेल’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम यांनी दिली.

Now placement cell In the postgraduate departments of Nagpur University, | नागपूर विद्यापीठाच्या प्रत्येक पदव्युत्तर विभागात आता ‘प्लेसमेन्ट सेल’

नागपूर विद्यापीठाच्या प्रत्येक पदव्युत्तर विभागात आता ‘प्लेसमेन्ट सेल’

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने ‘प्लेसमेन्ट सेल’चा स्थापना करण्यात आली होती. परंतु या ‘सेल’कडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता प्रशासनाने ‘प्लेसमेन्ट’ वाढविण्यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक पदव्युत्तर विभागात ‘प्लेसमेन्ट सेल’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम यांनी दिली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधूनच कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांत ‘प्लेसमेन्ट सेल’ सुरू करण्याचे निर्देश दिले होते. नागपूर विद्यापीठात काही वर्षांअगोदर ‘प्लेसमेन्ट सेल’ची स्थापना करण्यात आली होती. परंतु याचा फारसा उपयोग झाला नाही. हा ‘सेल’ केवळ नावापुरताच होता व विद्यार्थ्यांना त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. विद्यापीठाने विधी विद्यापीठ परिसरात ‘प्लेसमेन्ट सेल’चे कार्यालयदेखील सुरू केले होते. परंतु हा ‘सेल’ प्रभावी नसल्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील उद्योगक्षेत्राच्या अपेक्षांबाबत फारसे मार्गदर्शन मिळत नव्हते. अनेकांना तर असा ‘सेल’ अस्तित्वात आहे, याचीच माहिती नव्हती.
अखेर यासंदर्भात प्रशासनाला जाग आली असून प्रत्येक पदव्युत्तर विभागात स्वतंत्र ‘प्लेसमेन्ट सेल’ सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्व विभागांना सूचनादेखील देण्यात आल्या असून तेथील प्राध्यापकांकडेच याचा अतिरिक्त कारभार देण्यात येणार असल्याची माहिती डॉ.मेश्राम यांनी दिली.

प्रभावी अंमलबजावणी हवी
मानव्यशास्त्रे व वाणिज्य-व्यवस्थापन विद्याशाखेमध्ये अनेक विद्यार्थी ‘प्लेसमेन्ट’साठी भटकत असल्याचे चित्र दिसून येते. इतर विद्याशाखेमध्ये हे प्रमाण थोडे कमी आहे. विभागांमध्ये ‘प्लेसमेन्ट सेल’ प्रभावीपणे सुरू झाले, तर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळू शकेल. शिवाय उद्योगक्षेत्राशी विद्यार्थीदशेतच जुळण्याची संधीदेखील मिळेल. परंतु यासाठी या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मत विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title: Now placement cell In the postgraduate departments of Nagpur University,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.