आता ‘इन्डोअर’ खेळा, स्विमिंगही करा : मनपा आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 09:30 PM2020-11-04T21:30:58+5:302020-11-04T21:33:39+5:30
Unlock, play 'indoor', also do swimming नागपुरात बॅडमिंटनसह बुद्धिबळ, बॉक्सिंग, कराटे, स्केटिंग आदी इन्डोअर क्रीडा प्रकार तसेच स्विमिंग पूल सुरू करण्याला परवानगी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात बॅडमिंटनसह बुद्धिबळ, बॉक्सिंग, कराटे, स्केटिंग आदी इन्डोअर क्रीडा प्रकार तसेच स्विमिंग पूल सुरू करण्याला परवानगी दिली आहे. तर सिनेमागृह, थिएटर, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह व सांस्कृतिक भवन यांना आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत गुरुवारपासून सुरू करण्याला महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परवानगी दिली आहे. बुधवारी त्यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
कोरोनामुळे मार्चपासून सिनेमागृह, नाट्यगृह, थिएटर बंद असल्याने या व्यवसायाला मोठा फटका बसला. अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले होते. नाट्यक्षेत्रातील घडामोडी बंद पडल्याने नाट्यप्रेमीत नाराजी व्यक्त केली जात होती.
बंद असलेल्या इन्डोअर क्रीडा सुविधा नागपुरात सुरू करण्याची आग्रही मागणी खेळाडू, पालक व क्रीडा संघटनांनी प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात बुधवारी क्रीडाप्रेमी शैलेंद्र घाटे यांनी आयुक्तांना निवेदन दिले. शासन दिशा-निर्देशानुसार इन्डोअर क्रीडा प्रकार सुरू करण्याला परवानगी आहे. पण इन्डोअर शब्दाचा उल्लेख नव्हता. इन्डोअरलाही परवानगी असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
दिशा-निर्देशांचे पालन करून सिमेमागृह, नाट्यगृह, इन्डोअर क्रीडा प्रकार सुरू करण्याला परवानगी मिळाल्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच क्रीडा संघटक, प्रशिक्षक व मार्गदर्शकांना दिलासा मिळाला आहे. मागील आठ महिन्यापासून बंद असलेला सराव करण्याला मिळणार असल्याने खेळाडूत उत्साह निर्माण झाला आहे.
‘लोकमत’इनपॅक्ट
उद्योग, व्यवसाय, प्रवासी वाहतूक यासाह विविध आस्थापना सुरू करण्याला परवानगी मिळाली. परंतु इन्डोअर क्रीडा प्रकाराला मात्र परवानगी मिळाली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात इन्डोअरचे दरवाजे कधी उघडणार? अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करताच मनपा प्रशासनाने याची दखल घेत इन्डोअर क्रीडा प्रकारासह सिनेमागृह व स्विमिंग पूल सुरू करण्यास परवानगी दिली.