.. आता रात्रीअपरात्री पोलीस महिलांना घरापर्यंत सोडतील !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:12+5:30
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. शहरातील कुठल्याही एरियात रात्री ९ नंतर एकट्या महिलेला घरी जाण्यासाठी वाहतुकीचे साधन मिळत नसेल, तर त्या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षातील १०० नंबर अथवा ०७१२२५६१२२२ यावर डायल केल्यास पोलीस तिच्या मदतीला धावून येतील आणि तिला सुखरुप घरी पोहचवतील.
शहर पोलिसांनी रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचलेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. अडचणीत असलेल्या महिलेने १०० नंबर डायल केल्यास कंट्रोल रुममध्ये तैनात ड्युटी अधिकारी अथवा कर्मचारी, ती महिला उपस्थित असलेली जागा व संपर्क नंबरची मागणी करेल. त्यानंतर नियंत्रण कक्षातून ती महिला कुठल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, ते लक्षात घेऊन त्या ठाण्यात संपर्क करून माहिती देण्यात येईल. त्या ठाण्यातील दोन महिला कर्मचारी सांगितलेल्या ठिकाणी पोहचून मदत करेल. त्या महिलेला घरी पोहचवून दिल्यानंतर कंट्रोल रुमला रिपोर्ट सुद्धा देईल. यासंदर्भात सोमवारी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्वच पोलीस स्टेशनला निर्देश दिले आहे. सोबतच ड्युटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणीत असलेल्या महिलेला सुखरुप घरी पोहचवून देण्याची ताकीदही दिली आहे. पोलीस आयुक्तांचे पत्र पोहचल्यानंतर बहुतांश ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी नियुक्तीही केली आहे.
मदत मागितल्यानंतर घरापर्यंत सोडणार पोलीस
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले की, रात्री ९ नंतर एकट्या महिलेला वाहतुकीचे साधन मिळत नसेल तर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. त्यांना पोलीस घरापर्यंत सुरक्षित पोहचविणार. त्यासाठी सर्वच ठाण्याला आवश्यक निर्देश दिले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल नंबरवर विश्वास ठेवू नका
हैदराबाद येथील घटनेनंतर सोशल मीडियावर महिलांच्या मदतीसाठी काही मोबाईल नंबर संपर्क करण्याचे आवाहन केले जात आहे. मदत मागणाºयाच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून संबंधित वाहनावर जीपीएसद्वारे नजर ठेवण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशा मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता, कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अडचणीत असलेल्या महिलांनी पोलीस नियंत्रण कक्षातच संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.