आता ‘स्मार्टफोन’ने मोजता येणार ध्वनिप्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:38 PM2019-09-26T23:38:52+5:302019-09-26T23:40:21+5:30
‘नीरी’च्या तंत्रज्ञांनी ‘नॉईज ट्रॅकर’ नावाचे ‘मोबाईल अॅप’ विकसित केले आहे. या माध्यमातून कुणालाही शहरातील कुठल्याही जागी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही काळापासून ध्वनिप्रदूषणाची समस्या वाढीस लागली असून, नागपूरसारख्या शहरातदेखील याची तीव्रता जाणवायला लागली आहे. अनेकदा निर्धारित पातळीपेक्षा जास्त आवाज असूनदेखील सामान्य जनतेला त्याबाबत माहिती मिळू शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे एक अनोखा पुढाकार घेण्यात आला आहे. ‘नीरी’च्या तंत्रज्ञांनी ‘नॉईज ट्रॅकर’ नावाचे ‘मोबाईल अॅप’ विकसित केले आहे. या माध्यमातून कुणालाही शहरातील कुठल्याही जागी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणार आहे.
पर्यावरण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या मानकांनुसार दिवसाच्या वेळी ५५ डेसिबल्स तर रात्री ४५ डेसिबल्सच्या आत आवाजाची पातळी हवी. परंतु शहरातील अनेक भागांत दिवसभर ध्वनी तीव्रता ही याहून फार जास्त असते. विशेष म्हणजे लोकांना आपण ध्वनिप्रदूषणाच्या पट्ट्यात आहोत, याची जाणीवदेखील होत नसते. नागरिकांना हीच बाब कळावी व त्यादृष्टीने पुढील उपाययोजना करता याव्यात, यासाठी हे ‘मोबाईल अॅप’ विकसित करण्यात आले आहे.
‘नीरी’तील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी सतीश लोखंडे यांनी हे ‘अॅप’ तयार केले आहे. गुरुवारपासूनच ‘गुगल प्ले स्टोअर’वर हे ‘अॅप’ मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. सामान्य जनता, संशोधक यांच्यासह केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अधिकाऱ्यांसाठीदेखील हे ‘अॅप’ अतिशय सोयीचे राहणार आहे.
आवाज मोजण्यासोबत ‘डाटा’देखील गोळा करणार
हे ‘अॅप’ सामान्य जनता व संशोधक या दोघांनाही डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात आले आहे. आवाजाची पातळी मोजणे व ‘डाटा’ गोळा करणे हे दोन्ही काम या माध्यमातून होऊ शकणार आहे. ‘जीपीएस’च्या माध्यमातून आवाजाचा नेमका ‘सोर्स’ काय आहे, हेदेखील शोधणे शक्य होणार आहे. ही सुविधा सर्वांना उपलब्ध राहील. तर आवाजाचा ‘डाटा’ व इतर तांत्रिक माहिती ही केवळ संशोधकांसाठी असेल. यात आवाजाची पातळी मोजणे, आवाज व ‘जीपीएस लोकेशन्स’चा ‘रेकॉर्ड’ ठेवणे इत्यादी कार्य होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे हा ‘डाटा’ अगदी सहजतेने विविध प्रकारे ‘शेअर’देखील केल्या जाऊ शकतो. यात ‘मॅप इट’ नावाचे एक ‘फिचर’ असून, सर्व माहिती गोळा झाल्यानंतर संपूर्ण कार्यक्षेत्राचा ‘स्टडीमॅप’ तयार होऊ शकतो.
कसे कार्य करते ‘अॅप’ ?
‘जीपीएस’च्या माध्यमातून ‘अॅप’ संबंधितांचे नेमके स्थळ शोधतो. तर मोबाईलमधील मायक्रोफोनच्या माध्यमातून आवाजाची पातळी मोजली जाते. मोबाईलच्या ‘स्क्रीन’वर ही माहिती झळकते. वापर करणारी व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आवाजाची पातळी मोजू शकते आणि संपूर्ण ‘डाटा’ एखाद्या तक्त्याच्या स्वरुपात पाहू शकते, अशी माहिती सतीश लोखंडे यांनी दिली. या कामात मंथन कोल्हे व मोहिंद्र जैन यांचेदेखील मौलिक सहकार्य लाभले. तर ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले, असे प्रतिपादन लोखंडे यांनी केले.
शहरात या भागात जास्त समस्या
सीताबर्डी, धंतोली, धरमपेठ, रामदासपेठ, सदर, मानेवाडा, मेडिकल चौक, इतवारी, महाल, ऑटोमोटिव्ह चौक, रेल्वे स्थानक, बसस्थानक, बैद्यनाथ चौक