आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 08:43 PM2022-11-14T20:43:08+5:302022-11-14T20:43:58+5:30
Nagpur News पासपोर्ट तयार करण्यासाठी काही विशिष्ट शहरांमध्ये असलेल्या सुविधा केंद्रांवर अवलंबून राहण्याची आता गरज नाही. प्रत्येक जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
नागपूर : विदेशवारीसाठी सरकारी परवाना अर्थात पासपोर्ट अतिशय महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. पासपोर्टशिवाय व्हिसा मिळत नाही आणि व्हिसाशिवाय कुणालाच देशाच्या बाहेर जाता येत नाही. आतापर्यंत विदर्भातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी लांब प्रवास करून नागपूरला पासपोर्ट सेवा केंद्रात यावे लागत होते. मात्र, पोस्टाने ही सेवा प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केल्याने, नागरिकांना आता आपल्याच जिल्ह्यात या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांची दगदग कमी झाली आहे.
पासपोर्टसाठी अर्ज कसा कराल?
- पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. त्यासाठी portalindia.gov.in या संकेतस्थळावर जावे. तेथे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मिळणारा आयडी घेऊन जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसच्या कार्यालयात जावे. नागपुरात पासपोर्टसाठी स्वतंत्र यंत्रणा असून, पासपोर्ट सेवा केंद्रात जावे लागेल. यानंतर कादगपत्रांची तपासणी केली जाते.
कागदपत्रे काय लागतात?
- पासपोर्ट काढण्यासाठी आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला, बँक पासबुक (राष्ट्रीयीकृत बँक), शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, महिलांकरिता लग्न झाल्याचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे लागतात. या आधारेच पासपोर्ट काढता येतो.
शुल्क किती?
- यासाठी नियमित अर्ज शुल्क १५००, तर तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज शुल्क २००० रुपये आहे. तुम्ही नेट बँकिंग किंवा अन्य पर्यायाद्वारे हे शुल्क भरू शकता.
नागपुरात सादिकाबाद येथे पासपोर्ट सेवा केंद्र
- नागपुरात भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाद्वारे पासपोर्ट काढण्यासाठी स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र असल्याने पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा प्रदान करण्यात आलेली नाही. हे कार्यालय पहिला माळा, बिलकिस प्लाझा, सादिकाबाद कम्युनिटी हॉल, मानकापूर, कोराडी रोड येथे आहे.
नागपुरात पासपोर्ट सेवा केंद्राची स्वतंत्र सुविधा असल्याने नागपुरात शासकीय पोस्ट कार्यालयांमध्ये पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. नागपूर जिल्हा वगळता नागपूर विभाग आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील पाेस्टाच्या मुख्य कार्यालयात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
- शिवकुमार रामामूर्ती, असिस्टंट सुपरिटेन्डेंट, जीपीओ, नागपूर
..............