आता नगरपंचायतीचा कारभारही रामभरोसे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:13+5:302021-09-10T04:13:13+5:30
भिवापूर : पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे गत वर्षभरापासून प्रशासकांच्या स्वाधीन असलेला नगरपंचायतीचा कारभार आता पुन्हा ‘रामभरोस’ झाला आहे. कारण मुख्याधिकारी ...
भिवापूर : पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे गत वर्षभरापासून प्रशासकांच्या स्वाधीन असलेला नगरपंचायतीचा कारभार आता पुन्हा ‘रामभरोस’ झाला आहे. कारण मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांची बदली झाली असून नवीन मुख्याधिकारी कोण, कधी रुजू होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर सुचिता पाणसरे या शहराच्या पहिल्या महिला मुख्याधिकारी म्हणून आरूढ झाल्या. रोखठोक कार्यशैली व नियमावर बोट ठेवून कर्तव्य बजावण्याचा त्यांच्या स्वभाव गुणामुळे काहींना त्रासही झाला. त्यांनी शहराच्या विकासाला दिशा दिली. दरम्यान जुलै २०१९ मध्ये त्यांची बदली होताच नागपूर महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे भिवापूरच्या मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्यात. मात्र त्यांच्या कार्यकाळात अधिकारी, पदाधिकारी व शहरवासीयांशी सुसंवादाची दारे कायम बंद होती. यातून शहरातील समस्यांची जाळेमुळे आणखीच खोलवर रूजत गेली. दरम्यानच्या काळात उमरेड नगरपरिषद व कुही नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे वर्षभरापासून दोन्ही ठिकाणचा प्रभार मुख्याधिकारी दखणे यांच्या खांद्यावर टाकण्यात आला. या काळात त्यांनी उमरेड येथे अधिक वेळ दिला. यातील काहीवेळ त्या कुही नगरपंचायतीला सुध्दा देत होत्या. अतिरिक्त कार्यभारात भिवापुरकरांच्या समस्या मात्र पाचविला पुजल्या गेल्या. यामुळे दखणे यांची बदली करण्याबाबत मध्यंतरी सूरही उमटला. दरम्यान बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश धडकले. प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर सुवर्णा दखणे यांची पनवेल महापालिकेच्या सहायक आयुक्तपदी बदली झालेली आहे.
प्रशासनावर भार
कार्यकाळ संपल्यामुळे वर्षभरापासून नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे आहे. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे हे नगरपंचायतीचे प्रशासक आहे. त्यामुळे तालुक्याचा अख्खा डोलारा सांभाळतानाच वर्षभरापासून नगरपंचायतीचा रथही ते ओढत आहे. याकाळात मुख्याधिकारी नगरपंचायतमध्ये बसत असल्यामुळे त्यांना प्रशासक म्हणून नगरपंचायतीच्या कामात मदत होत होती. मात्र आता मुख्याधिकारी दखणे यांची बदली झाल्यामुळे प्रशासकांवर कामाचे ओझे, व्याप आणि ताण वाढला आहे.