आता महाविद्यालयांकडे प्रवेश नोंदणीची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:10 AM2021-08-24T04:10:39+5:302021-08-24T04:10:39+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले होते; परंतु काही विद्यार्थी विविध कारणांमुळे अखेरच्या मुदतीपर्यंत प्रवेश घेऊ शकले नव्हते. अशा विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांमध्ये जाऊन नोंदणी करून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. प्रवेश नोंदणीची जबाबदारी महाविद्यालयांकडे राहणार असून विद्यार्थ्यांनी दिलेले शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठात जमा करायचे आहे.
नागपूर विद्यापीठाने नोंदणीसाठी २० रुपये आकारल्याने अनेकांकडून विरोध झाला. प्राधिकरण सदस्यांनीदेखील याविरोधात भूमिका घेतली. मात्र, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला नाही. १८ ऑगस्टपर्यंत ज्यांना नोंदणी करता आली नाही त्यांना थेट संंबंधित महाविद्यालयात जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. महाविद्यालयांना ५ सप्टेंबरपर्यंत यानुसार नोंदणी करता येणार आहे.
विद्यापीठाच्या या निर्देशांवरून महाविद्यालयांतदेखील नाराजीचा सूर आहे. विद्यापीठाने काहीच करायचे नाही व प्रशासकीय कामांचे ओझे महाविद्यालयांवर टाकायचे ही अयोग्य बाब असल्याची भावना विद्यापीठ वर्तुळात आहे. नियोजित वेळापत्रकानुसार २४ ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर करायची होती; परंतु आता ५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिल्याने नेमके कोणते वेळापत्रक पाळायचे हा प्रश्न महाविद्यालयांसमोर पडला आहे.
विद्यार्थी संघटनांकडून विरोध
दरम्यान, विद्यापीठाच्या या नवीन परिपत्रकाचा विद्यार्थी संघटनांकडून विरोध होत आहे. विदर्भ स्टुडंट अँड यूथ ऑर्गनायझेशनने विद्यार्थ्यांची बाजू लावून धरली आहे. विद्यापीठाच्या बेजबाबदार धोरणांमुळे पदवी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. संभ्रमात टाकणाऱ्या सूचना प्रकाशित करून महाविद्यालय, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संभ्रमित करण्याचे काम विद्यापीठ करीत आहे. विद्यापीठाने स्पष्ट निर्देश देत नोंदणीचे वीस रुपये शुल्क रद्द करावे, अशी मागणी विदर्भ स्टुडंट अँड यूज ऑर्गनायझेशनचे संयोजक अनिकेत मते यांनी केली.